मुंबई | 07 सप्टेंबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाकडून भाजपवर निशाणा साधण्यात येतो. हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून भाजप आणि ठाकरे गटाकडून दोन्ही बाजूने टीका केली जाते. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर तोफ डागण्यात आली आहे. हिंदुत्वांच्या मुद्द्यावरून सामनातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. सामनातून भाजपवर टीका करताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा दाखला देण्यात आला आहे. बाळासाहेबांना हे असं हिंदुत्व मान्य नव्हतं, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
जगातील कोणताही धर्म निर्दोष नाही. भाजपचे हिंदुत्व जसे ढोंगी तसे ढोंग सर्वच धर्मांत आहे. सनातन धर्म गाईला देवता-माता मानतो. वीर सावरकरांना गोमातेचे थोतांड मान्य नाही. बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदयसम्राट, पण त्यांनीही स्पष्टच सांगितले , शेंडी – जानव्याचे , घंटा बडवणाऱ्यांचे हिंदुत्व आपल्याला मान्य नाही . याउलट भाजपचे आहे . ते निवडणुकीत राम – बजरंग बली आणतात व लोकसभेत राजेशाहीचे प्रतीक म्हणून ‘सेंगोल’ आणतात . हे विज्ञान नसून रूढीवाद आणि हुकूमशाही आहे.
समाजाला जुन्याच परंपरांत अडकवणारा ‘सनातनी’ विचार नव्या पिढीस मान्य नाही. धर्म तसाच राहील. जुनाट परंपरा , रूढी , विषमतेची जळमटे गळून पडतील . उदयनिधी स्टालिन , रशियात लेनीन आणि स्टॅलिनचा विचारही टिकला नाही . त्यांचे पुतळे लोकांनी तोडले , पण हिंदुस्थानात सनातन धर्म आहे. राहील!
हिंदू धर्म हा एक पृथ्वीतलावरील सगळय़ात जुना धर्म आहे. 5 हजार वर्षांपूर्वी हा धर्म स्थापन झाला. अनेक संकटे, वादळे, घाव अंगावर झेलून या धर्माची पताका फडकत आहे. त्यासाठी महाभारत काळापासून अगणित लोकांनी बलिदाने दिली आहेत. तलवारीच्या आणि तागडीच्या जोरावर हा सनातन धर्म विकलांग करण्याचा प्रयत्न झाला, पण धर्माची पताका फडकत आहे. त्यामुळे तामीळनाडूचे एक मंत्री उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्माविषयी तोडलेले तारे अज्ञानाच्या अंधारात लुप्त झाले आहेत. उदयनिधी काय म्हणाले? ”सनातन धर्म सामाजिक न्याय आणि समानतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही, त्यांना संपवूनच टाकावे लागते.
भारतीय जनता पक्ष व त्यांच्या बजरंगी बगलबच्च्यांना तर उदयनिधींच्या वक्तव्याने उकळय़ाच फुटल्या. उदयनिधींना उत्तर त्याच भाषेत द्यायला हवे. ते देण्याचे सोडून ‘इंडिया’ आघाडी आता उदयनिधींवर काय भूमिका घेणार? शिवसेनेचे यावर काय धोरण आहे? वगैरे प्रश्न विचारले गेले. शिवसेनेची भूमिका ही जुनीजाणती म्हणजे ‘गर्व से कहो हम हिंदू है’ हीच आहे व राहणार. ममता बॅनर्जींपासून केजरीवाल, काँग्रेस वगैरे लोकांनीही उदयनिधींच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. दोष तर सर्वच धर्मांत आहेत, पण हिंदू धर्माने हे दोष दूर करण्यासाठी सतत प्रयत्न केले.
सतीची चाल, अस्पृश्यता, विषमता, स्त्री शिक्षण अशा अनेक विषयांवर हिंदू धर्माने प्रगतशील भूमिका घेतली. डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या लाखो बांधवांसह हिंदू धर्माचा त्याग केला. धर्मातील स्पृश्य-अस्पृश्यता आणि रूढी-परंपरेच्या विरोधात त्यांनी बंड केले. या बंडापासून सनातन धर्माने धडा घेतला व सामाजिक न्यायाचे तत्त्व स्वीकारले. धर्म जागच्या जागीच आहे; पण अस्पृश्यता, रूढी-परंपरांना मलेरिया, डेंग्यूप्रमाणे आपण खतम केले. उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्माचा हा इतिहास समजून घेतला पाहिजे.