मुंबई : सध्या कर्नाटक मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहे. त्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. यावेळी तिथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. याच दरम्यान महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वादाचा मुद्दा देखील चर्चेत येण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे देखील 3 आणि 4 मे ला कर्नाटकमध्ये जाऊन प्रचार करणार आहे. त्याची माहिती देत असतांना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचलं आहे. त्यामध्ये संजय राऊत यांनी शिंदे आणि फडणवीस यांना आव्हान देत मराठीचा मुद्दा उपस्थित केला आहे.
3 आणि 4 मे ला मी कर्नाटकच्या सीमा भागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचारासाठी जातोय, काल माझं शरद पवार यांच्याशी या विषयी बोलणे झाले आहे. तर आज सकाळी माझी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झालेली आहे . कर्नाटक येथे मी प्रचाराला जाणार आहे असं संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.
आम्ही असं ठरवले आहे की, महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करायचा. या वेळेला कधी नव्हे ते त्यांच्यात फाटाफुट झालेली नाही. महाराष्ट्र एकीकरण समिती पहिल्यांदाच एक संघ आहे. त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे मतभेद दिसत नाहीये. यापूर्वी त्यांच्यात मतभेद होते.
मला खात्री आहे या वेळेला कर्नाटकच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार असतील. माझे आव्हान आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना स्वतःला म्हणतात ना मी बेळगाव आंदोलनात भाग घेतला आणि तुरुंगात गेलो होती. तर आता ती वेळ आली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचाराला आमच्या सोबत या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही संजय राऊत यांनी आव्हान दिले असून महाराष्ट्रात एकीकरण समितिच्या प्रचाराला तुम्ही या. मराठी मातीचे काही देणं लागत असाल आणि मराठी माणसाबद्दल तुमच्यात अस्मिता असेल तर तुम्ही हिम्मत दाखवून प्रचाराला या असेही आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे.
शिंदे आणि फडणवीस यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या, मराठी माणसाच्या प्रचारासाठी बेळगावात पुढल्या आठ दिवसात यायला हवं आणि त्यांनी जाहीर करावा आम्ही येतो. नाहीतर, त्यांचा महाराष्ट्र एकीकरण समितीशी कुठलाही संबंध नाही आणि बेळगावशी कुठलाही संबंध नाही किंवा खोटे दाखले देऊ नयेत आम्ही तुरुंगात गेलो असे, असे म्हणत संजय राऊत यांनी शिंदेंसह फडणवीस यांना डिवचलं आहे.