मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार देण्यात आला. पण याच पुरस्कार सोहळ्यात दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये उष्माघातामुळे श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने मदतही जाहीर करण्यात आली आहे. यावरून मात्र आता महाराष्ट्रात उलट सुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून हल्लाबोल केला आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आम्ही मानतो पण राजकीय कुरघोडी करण्यासाठी श्री सदस्यांना तासंतास बसून ठेवलं असा दावा संजय राऊत यांनी करत महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा हा सायंकाळी ठेवता आला असता पण अमित शाह यांनी दुपारची वेळ दिली म्हणून तो कार्यक्रम घेतला होता. सहा तासाच्या वर श्री सदस्य बसून होते. त्यांचा कुठलाही विचार सरकारने केला नाही, फक्त व्यासपीठावर असलेल्या लोकांचा विचार केला.
आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आम्ही मानतो, त्यांच्या बद्दल आम्हाला आदर. पण श्री सदस्य मोठ्या प्रमाणात येणार असतांना कडक उन्हात ते बसून होते आयोजकांनी त्यांची व्यवस्था केली नाही असं म्हणत संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे यांनाही त्यांनी यावेळी डिवचलं.
सरकार मध्ये अनेक तज्ज्ञ लोकं असतात. त्यांना याबाबत विचारायला पाहिजे होते उष्माघातामुळे झालेला मृत्यू बघता ही बाब गंभीर आहे. त्याबाबत चौकशी केली पाहिजे. राजकीय लोकांच्या अट्टाहासामुळे श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आयोजकांच्या जबाबदारीवर संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.
खरंतर महाराष्ट्र सरकारच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जातो. सन्मानपत्र आणि 25 लाख रुपये असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. मागील वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली होती.
त्याच पार्श्वभूमीवर रविवारी मोठ्या दिमाखात झालेल्या पुरस्कार सोहळ्यात दुर्दैवी घटना घडली आहे. त्यावरून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे राजकीय आरोप प्रत्यारोप देखील पाहायला मिळत आहे.