प्रदिप कापसे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, मुंबई | 20 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या पेटला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील राज्यात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. अशातच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला विरोध करण्यात येत आहे. कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याला ओबीसी समाजाने विरोध केला आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात एल्गार महासभा झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन्ही समाजात वाद पाहायला मिळतोय. अशातच ओबीसी नेत्यांचं शिष्टमंडळ आज संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेणार आहे.
जालन्यातील सभेतून छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण घेण्याला त्यांनी कडाडून विरोध केला आहे. यानंतर संभाजीराजे यांनी छगन भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांचं शिष्टमंडळ आज संभाजीराजेंना भेटणार आहे. या भेटीकडे सर्वांचं लक्ष आहे.
ओबीसी नेते हरिभाऊ राठोड आणि ओबीसीमधील वेगवेगळ्या जातींच्या नेत्यांचं शिष्टमंडळ या सगळ्याच्या पार्श्र्वभूमीवर संभाजीराजे यांना भेटणार आहे.यामुळे ओबीसींचा एक मोठा गट छत्रपती संभाजीराजेंना पाठिंबा देतो का? सध्या सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाबाबत ओबीसी समाजाचे हे नेते काय भूमिका घेतात, हे आज स्पष्ट होणार आहे. या ओबीसी नेत्यांनी संभाजीराजेंना पाठिंबा दिला तर छगन भुजबळ यावर काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असेल.
आज दुपारी चार वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरला ही भेट होणार आहे. या भेटीकडे राज्याचं लक्ष आहे. या भेटीनंतर संभाजीराजे आणि ओबीसी नेते यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत हे नेते काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असेल.
एकीकडे ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षणाला ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. छगन भुजबळ यांच्या भूमिकेचा संभाजीराजे छत्रपतींनीही विरोध केला आहे. अशातच ओबीसी नेत्यांचं एक शिष्टमंडळ संभाजीराजेंची भेट घेणार आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष आहे.