मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर निवासस्थानी बीकेसी पोलिसांचं (police) एक पथक दाखल झालं असून त्यांनी फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. फडणवीस यांनी बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केला होता. याप्रकरणी फडणवीस यांचा जबाब नोंदवला जात असल्याचं सांगितलं जात आहे. ही प्रक्रिया किती वेळ चालेल याबाबतची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, ही चौकशी सुरू होण्यापूर्वी सागर बंगल्यावर भाजपचे (bjp) बडे नेते पोहोचले होते. या नेत्यांनी फडणवीसांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या प्रकरणाच्या सर्व बाजू या नेत्यांनी जाणून घेतल्या असून पुढील रणनीतीवरही यावेळी चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच भाजपने राज्यभरात नोटीशीची होळी सुरू केली आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली त्यावर भाजपच्या कोणत्याही नेत्याने भाष्य केलं नाही.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, कृपाशंकर सिंह, नितेश राणे, प्रसाद लाड, कालिदास कोळंबकर आदी नेते या बैठकीला उपस्थित होते. तब्बल अर्धा पाऊण तास या नेत्यांची बैठक झाली. मात्र बैठीकत कोणती चर्चा झाली हे सांगण्यात आलं नाही. आमदार नितेश राणे यांनी मात्र इतर विषयांवर चर्चा झाल्याचं सांगितलं. त्यानंतर बीकेसी पोलिसांचं एक पथक फडणवीसांच्या सागर बंगल्यावर आलं असून त्यांनी फडणवीसांचा जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, फडणवीसांची चौकशी सुरू असताना भाजपने राज्यभरात जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. फडणवीस यांना आलेल्या नोटिशीची भाजपच्या नेत्यांनी ठिकठिकाणी होळी केली आहे. अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत भाजपचे नेते एकटवले असून ठाकरे सरकारविरोधात संताप व्यक्त केले जात आहेत.
दुर्योधन आणि दुशासन देखील महाविकास आघाडी सरकार हमारी बाप लगती है असं म्हणत असतील, असा घणाघात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय. विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलीस बदली घोटाळ्याप्रकरणी चौकशीची नोटीस देण्यावरून चंद्रपुरात आज आंदोलन करण्यात आले. या वेळी बोलताना मुनगंटीवार यांनी हा घणाघात केलाय. चंद्रपुरात भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या नेतृत्वात गांधी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. या वेळी फडणवीस यांना दिलेल्या नोटीसीची होळी देखील करण्यात आली. घोटाळा शोधून काढणाऱ्या विरोधीपक्ष नेत्याला चौकशीच्या फेऱ्यात अडकविल्याबद्दल भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केला. घोटाळेबाजांना वाचविणाऱ्या सरकार विरोधात रस्त्यावर उतरून निकराचा संघर्ष करण्याची भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडी सरकारने आपले घोटाळे अशाच पद्धतीने लपविण्याचा प्रयत्न चालविल्याचा आरोप भाजपने केला.
संबंधित बातम्या:
VIDEO: एका व्हिडीओ बॉम्बने सर्व चिडीचूप, फडणवीसांचा दुसरा बॉम्ब येतोय; चंद्रकांतदादांचा दावा
Devedra Fadnavis Live Blog : पोलिसांचं पथक ‘सागर’ बंगल्यावर दाखल; फडणवीसांचा जबाब नोंदवण्यास सुरुवात
फडणवीस पुरून उरतील, ते किती तरी ठाकरे-पवार खिशात घालून फिरतात; निलेश राणेंचा हल्लाबोल