मुंबई | 8 सप्टेंबर 2023 : मुलगा घराबाहेर खेळत असल्याने आई निर्धास्त होती, मात्र बराच वेळ झाला तरी तो परत न आल्याने तिचं धाबं दणाणलं. अखेर तिने पोलिसांत धाव घेतली असता, पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत अवघ्या १२ तासांच्या आत हरवलेल्या मुलाला (missing boy found) शोधून काढलं. डी.एन.नगर पोलिसांनी या कारवाईचे खूप कौतुक होत आहे. 5 सप्टेंबर रोजी शेरबानो सरफराज शेख यांनी पोलीसांत तक्रार नोंदवली होती. त्यांचा ८ वर्षांचा गतिमंद मुलगा हा दुपारी बाहेर खेळायला गेला होता, पण अनेक तास उलटून गेले तरी तो परत आलाच नाही असे त्यांनी पोलिसांना सांगितले.
अल्पवयीन मुलगा हरवल्याची तक्रार येताच, पोलिसांनी ती गांभीर्याने घेतली आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्या मुलाच्या तपासासाठी पोलिस आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची अनेक पथके तयार करण्यात आली. त्यादरम्यान पोलिसांनी रेल्वे स्टेशनजवळील सीसीटीव्ही फूटेज तपासले असता, तो लहान मुलगा स्टेशनमध्ये शिरताना त्यांना दिसला. तो मुलगा एकटाच असून स्टेशनवर पोहोचल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने बोरिवलीच्या दिशेन जाणारी ट्रेन पकडली असावी किंवा फारतर तो दहिसरपर्यंत गेला असावा, असा कयास त्यांनी बांधला व पुढील शोध सुरू केला. अंधेरी ते दहिसरपर्यंतच्या परिसरात पोलिसांची अनेक पथके तैनात करून गस्त घालण्यास सुरूवात केली.
अखेर अथक प्रयत्नांनंतर दहिसर पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी हरवलेल्या मुलाला 12 तासांच्या आतच शोधून काढले. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी डीएन नगर पोलिसांचे कौतुक केले आहे.