मुंबईसह उपनगरांत शनिवार पहाटेपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार येत्या काही तासांमध्ये मुंबईत आणखी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. यामुळे मुंबईकरांची मोठी तारांबळ उडाली असून पावसाचा परिणाम मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनावरही होणार आहे. सतत कोसळणारा पाऊस आणि तांत्रिक बिघाडामुळे मध्ये रेल्वेची वाहतूक विलंबाने सुरू आहे. कल्याण वरून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या १० ते १५ मिनिटे तर पश्चिम रेल्वेवरील वाहतूकही ५-१० मिनिटे उशीराने सुरू आहे. तसेच हार्बर लाईनवरील लोकलही १५ ते २० मिनिटे उशिरा आहे.
सखल भागांत साचलं पाणी
शनिवार पहाटेपासूनच पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली असून मुंबईसह उपनगरांना पावसाने झोडपून काढले आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचायला सुरवात झाली आहे. हवामान खात्याकडून आज मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आज व्यक्त करण्यात आला असून आवश्यकता असल्यासच बाहेर पडावे . पहाटेपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील सखल भागांमध्ये आतापासूनच पाणी साचले आहे. याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर होण्याची शक्यता आहे.
कुठे , काय परिस्थिती ?
अंधेरी सबवे येथेही मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरूवात झाली असून तो वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. पहाटे पासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भांडुप एल बी एस मार्ग पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. दरम्यान वसई, विरार, नालासोपाऱ्यात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. नवी मुंबईत पावसाने काही काळ विश्रांती घेतली होती. मात्र थोड्या वेळापूर्वी पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून तेथेही अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एपीएमसी मार्केटमध्ये देखील पाणी साचल्याचे वृत्त आहे.
#WATCH | Mumbai: Rain lashes parts of Mumbai city; visuals from Western Express Highway, Vile Parle. pic.twitter.com/m5lr4Tm1op
— ANI (@ANI) July 20, 2024
कल्याण, डोंबिवलीतही पावसाचा जोर
मुंबई शहरासह ठाणे, कल्याण आणि डोंबिवली या उपनगरी परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. पुढले काही तास शहरात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. या भागालाही पावसाने झोडपून काढल्याने रस्ते वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे.
तसेच काल रात्रीपासून अंधेरी, कांदिवली, मालाड, बोरिवली, दहिसर, गोरेगाव या भागांतही जोरदार पाऊस सुरू आहे.
या जिल्ह्यांना दिला रेड अलर्ट
कोकणातील रत्नागिरी आणि विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना आज, (शनिवार) मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच ठाणे, रायगड, सातारा, सिंधुदुर्ग, नांदेडलाही अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे शाळा-कॉलेजेसना सुट्टी
मुंबईसह राज्यभरातही आज पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. नागपूरमध्येही सकाळपासून धो-धो पाऊस कोसळत असून जिल्ह्याला आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आले. नागपुरातील विमानतळ परिसरातही पाणी साचायला सुरूवात झाली आहे. पावसामुळे आज शहरातील सर्व शाळा – कॉलेजसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागपूरचे विपीन ईटनकर यांनी हे आदेश दिले आहेत.