गेल्या काही दिवसांपासून लपंडाव खेळणाऱ्या पावसाने अखेर आज (बुधवारी) सकाळी मुंबईत हजेरी लावल्याचे दिसत आहे.मंगळवारी रात्री मुंबई शहर आणि उपनगर परिसरात पावसाच्या काही मुसळधार सरी कोसळल्या, तसेच रात्रभर पावसाची रिपरिप सुरूच आहे. मात्र बुधवार पहाटेपासूनच मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. वरळी, दादर माटुंगा या परिसरासह उपनगरातही पावसाने हजेरी लावली आणि वातावरणात गारवा आला. त्यामुळे उकाडा, घामामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे. बोरिवली, गोरेगाव, अंधेरीसह वांद्रे परिसरातही जोरदार पाऊस झाला.
दादर माटुंगा परिसरात सकाळी 7 वाजल्यापासून रिमझिम पावसाला सुरवात झाली असून आज दिवसभर मुंबईतील वातावरण ढगाळ राहील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच कोकण पट्ट्यात आज मुसळधार पाऊस होऊ शकतो. येत्या 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे वरळी व तसेच दादर या सखल भागात पाणीदेखील साचल्याचे चित्र पाहायला मिळालं. पुन्हा एकदा नालेसफाई वरती प्रश्नचिन्ह सध्या उभे राहत आहे. तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्नही उपस्थित होऊ शकतो. पावासमुळे रेल्वे सेवेवरही परिणाम होण्याची शक्यता असून मुंबईकरांच्या मनात ती धास्तीही असतेच. सध्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी आणि ढगांचा गडगडाट सुरु आहे. त्यामुळे आज मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
पेरण्या खोळंबल्या
दरम्यान राज्यात पावसाने आठवडाभरापासून ओढ दिल्याने तापमानात वाढ होऊन पुन्हा उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. १८ जून अखेर राज्यात सरासरीच्या तुलनेत फक्त ५.६९ टक्के पेरण्या झाल्या असून, पावसाने अल्पविश्रांती घेतल्याने शेतकरी पेरण्यांबाबत संभ्रमात आहेत. मागील पाच वर्षांची सरासरी पाहता, १८ जूनअखेर राज्यात सरासरी १,४२,०२,३१८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होते. यंदा १८ जूनअखेर राज्यात जेमतेम ५.६९ टक्के म्हणजे ८,०८,७९२ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
विभागनिहाय पेरणीचा विचार करता, छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत सर्वांधिक सरासरीच्या तुलनेत ११.५५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्या खालोखाल नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये सरासरीच्या तुलनेत ११.४२ टक्के पेरण्या झाल्या आहेत.
सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडलेल्या कोकण विभागात जेमतेम १.६६ टक्के, पावसाने ओढ दिलेल्या नागपूर विभागात ०.०८ टक्के, अमरावती विभागात ३.४९ टक्के, लातूर विभागात ५.१९ टक्के, कोल्हापूर विभागात ६.३२ टक्के आणि पुणे विभागात २.२० टक्के पेरण्या झाल्या आहेत.