मुंबई | 02 ऑगस्ट 2023 : सध्या सोशल मीडियावर रील्सचा जमाना आहे. ‘शॉर्ट बट स्वीट’ पॅटर्नमधल्या या व्हीडिओंना नेचकऱ्यांची पसंती मिळते. हलक्या-फुलक्या विषयांवर हे रील्स बनवले जातात. तसंच धीर-गंभीर विषयांवरही सहज-सोप्या भाषेतून या रील्समधून भाष्य केलं जातं. या रील्सने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही भूरळ घातली आहे. मनसेचा रिलबाज पुरस्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी आपला आवडता रील्स स्टार कोण हे सांगितलं आहे.
रिलबाज पुरस्कार सोहळ्यात राज ठाकरे बोलत होते. राज ठाकरे यांची नजर एका रील्स स्टारवर पडली. तेव्हा अरे तू पण आला आहेस का? हा माझा अत्यंत आवडता. तू उभा राहा… तुझ्या सगळ्या गोष्टी मी पाहात असतो बरं का…, असं राज ठाकरे म्हणाले. तेव्हा त्या रील्स स्टारच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं. त्याने राज ठाकरेंना हात जोडले. हा रील्स स्टार म्हणजे पुण्याचा अथर्व सुदामे…
अथर्व सुदामे हा मूळचा पुण्याचा आहे. अस्सल पुणेकरांचा टोमणे मारण्याचा गुणधर्म अथर्वमध्येही ठासून भरला आहे. हजरजबाबीपणा, इरसालपणा अथर्वच्या रील्समध्ये पाहायला मिळतो. अथर्व सुदामेचे रील्स नेटकऱ्यांना भावतात. राज ठाकरे यांनाही हे रील्स आवडतात.
राज ठाकरे यांचं भाषण सुरु असताना श्रोत्यांमधून आवाज आला. आय लव्ह यू राजसाहेब… याला राज ठाकरेंनीही उत्तर दिलं. राज ठाकरे म्हणाले, लव्ह यू…
मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण रिलबाज पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. काल संध्याकाळी हा सोहळा पार पडला. या सोहळ्यात सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
अथर्व सुदामे आणि विनायक माळी यांना मंचावर बोलावून राज ठाकरे यांनी त्यांचं कौतुक केलं. तसंच त्यांनी सर्व रिल्सस्टार्सला महत्वाची जबाबदारी दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनाकडून रिल्स कलाकारांचे सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात राज्यभरातील नामवंत मराठी रिल्स कलाकार उपस्थित होते. राज ठाकरे यांनी रील्स स्टार्सचं या कार्यक्रमात कौतुकही केलं. रील्स कलाकार अथर्व सुदामे, डेनी पंडित, सुमित पाटील, आदित्य सातपुते, अंकिता वालावालकर, समीक्षा यांच्यासह इतरही सोशल मीडिया स्टार्स उपस्थित होते.