मुंबई | 26 जुलै 2023 : ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढ दिवस आहे. अशात त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अशात ठाकरेंचे विश्वासू शिलेदार राजन साळवी यांनी वाढदिवसाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांना कायम सोबत राहण्याचा शब्द दिला आहे. आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मी मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आम्ही सगळे निष्ठावान शिवसैनिक त्यांच्यासोबत आहोत, असं राजन साळवी म्हणाले.
आम्ही सगळेजण उद्धवजींसोबत आहोत आणि मरेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहे. यामध्ये कुठल्याही दुमत नाहीये. जे सोडून गेले ते गद्दार होते. त्यांच्या जाण्याने आम्हाला काही फरक पडत नाही, असं राजन साळवी म्हणाले आहेत.
आम्ही सगळे वाघ आहोत आणि ते सगळे खेकडे आहेत, असं मी स्पष्ट सांगतो. कारण ज्यांच्या मतावर ज्यांच्या विचारावरती निवडून आले त्या पक्षाला हे लोक सोडून गेले आणि आज सत्तेमध्ये जाऊन बसले, जनता यांना माफ करणार नाही, असं राजन साळवी म्हणाले आहेत.
वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांची मुलाखत आज प्रसिद्ध झाली आहे. यात उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. शिंदे गट खेकडा असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावर भाजपने आणि शिंदे गटाने पलटवार केला आहे. त्यावरून आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनीही शिंदे गटावर निशाणा साधला आहे. पोटात पोटशूळ उठणं साहजिक आहे. उद्धव ठाकरे यांनी दिलेले विचार शिवसैनिकांपर्यंत पोहोचवले आहेत. भाजपची टिवटिव मुलाखतीमुळ सुरू झाली आहे. गद्दारांची पिलावळ आता वळवळायला लागली आहे, असं विनायक राऊत म्हणालेत.
मणिपूर मध्ये हिंसाचार सुरू आहे तो शासन पुरस्कृत आहे. मणिपूरमध्ये मानवी हत्यांचं सत्र सुरू आहे.यावर लोकसभेत चर्चा व्हावी आणि त्यावर पंतप्रधान यांनी बोलावं ही आमची मागणी आहे. पंतप्रधान बोलत नाहीत. सोमवारपासून या विषयावर चर्चा होईल अशी अपेक्षा आहे. पण तसं झालं नाही. म्हणून आम्हाला अविश्वास प्रस्ताव मांडावा लागला आहे. बहुमत भाजपकडे आहे. त्यामुळं प्रस्ताव फेटाळला जाईल हे आम्हाला माहीत आहे. पण आमच्या हाती असलेल्या आयुधाला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान यांना सभागृहात यावंच लागेल, असं विनायक राऊत म्हणालेत.