काँग्रेसने युतीचं महत्व शिकायला हवं; सामनातून काँग्रेसला सल्ला

| Updated on: Dec 19, 2023 | 8:33 AM

Saamana Editorial on India Alliance : इंडिया आघाडीच्या रथाचा सारथी कोण?; सामनाच्या अग्रलेखातून खासदार संजय राऊत यांचं स्पष्ट भाष्य.. प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याचाही सामनात दाखला देण्यात आला आहे. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सल्लाही देण्यात आला आहे. वाचा सविस्तर...

काँग्रेसने युतीचं महत्व शिकायला हवं; सामनातून काँग्रेसला सल्ला
Follow us on

मुंबई | 19 डिसेंबर 2023 : देशभरातील विरोधकांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीचं नेतृत्व कोण करणार असा प्रश्न वारंवार विचारला जातो. यावर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. ‘इंडिया’चा रथ! सारथी कोण?’ या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरही सामनातून भाष्य करण्यात आलंय. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याचा दाखला देत एकत्र राहण्याचा संदेश काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सामनातून देण्यात आलाय. इंडिया आघाडीचा सारथी कोण असेल, यावरही सामनातून भाष्य करण्यात आलं आहे.

सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा

138 वा स्थापना दिवस काँग्रेस साजरा करीत असताना 2024 साठी किमान 150 लोकसभा खासदार निवडून आणण्याचा संकल्प या मंडळींनी सोडला पाहिजे. ‘इंडिया’ आघाडी मजबूत व मोकळी राहिली तरच ते शक्य आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. ”काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने इतिहासातून युतीचे महत्त्व शिकायला हवे. हिटलरचा पराभव हा अनेक देशांच्या एकजुटीतूनच झाला होता.” हुकूमशाहीचा पराभव हा एकजुटीतूनच होतो. काँग्रेसला त्या दृष्टीने पुढाकार घ्यावाच लागेल. बैठका होतील. प्रश्न कृतीचा आणि ऐक्याच्या वज्रमुठीचा आहे. हिटलरचा पराभव करूच हे ध्येय हवेच हवे! इंडिया जिंकेल. तीन राज्यांतील निकाल म्हणजे भाजपचा अमरपट्टा नाही. मोदी-शहा अजिंक्य नाहीत. फक्त ‘इंडिया’ आघाडी अभेद्य हवी इतकेच!

काँग्रेसने युतीचे महत्त्व शिकायला हवे, असा सल्ला श्री. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीरपणे दिला आहे. आंबेडकरांचे म्हणणे चुकीचे नाही. पण ‘युती’ आणि ‘आघाडी’चे महत्त्व प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. त्यात श्री. आंबेडकरदेखील आहेत. 2024 ची लढाई मोदी-शहांच्या ‘नव’भाजपशी आहे. त्याचबरोबर ईव्हीएम, प्रचंड पैसा व पेंद्रीय तपास यंत्रणांशी आहे. या सगळ्यांच्या जोरावर मोदी मंडळाने ‘अब की बार चारशे पार’चा आकडा लावला आहे. या पार्श्वभूमीवर ‘इंडिया’ आघाडीची बैठक आज राजधानी दिल्लीत होत आहे. या बैठकीसाठी काँग्रेसने पुढाकार घेतला हे बरे झाले. पण काँग्रेसच्या आवतणाचा मान राखून किती वऱ्हाडी आणि वाजंत्री जमतात हे पाहावे लागेल.

काँग्रेसला 40 टक्के मते मिळाली, तरीही मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड काँग्रेसने गमावले. राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता होती. मध्य प्रदेशात बदलाचे वारे वाहत होते व वातावरण काँग्रेससाठी चांगले आहे, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. ‘भारत जोडो’ यात्रेची सुरुवातच मध्य प्रदेशातून झाली. पण काँग्रेसचा सगळ्यात दारुण पराभव मध्य प्रदेशात झाला. भरवशाच्या म्हशीला ‘टोणगा’च झाला.

तिन्ही राज्ये ‘इंडिया’ने गमावली नसून काँग्रेसने गमावली. काँग्रेसला विजयाचा ‘केक’ एकट्याला खायचा होता. त्यामुळे राज्यातील लहान पक्ष, आघाड्या वगैरेंना दूर ठेवले. मध्य प्रदेशात अखिलेश यादव यांना ठरवून दूर ठेवले. जेथे काँग्रेस स्वबळावर येण्याची शक्यता निर्माण होते तेथे ते कोणालाच सोबत घ्यायला तयार नाहीत व त्या अहंकारात स्वतःबरोबर ‘इंडिया’चे नुकसान करतात असा बोल लावला जातो. ही प्रतिमा काँग्रेसला पुसावी लागेल.