मुंबई | 23 नोव्हेंबर 2023 : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी एक फोटो ट्विट केला. या फोटोत दिसणारी व्यक्ती चीनमधील मकाऊ शहरात जुगार खेळत असल्याचा दावा त्यांनी केला. शिवाय या कॅसिनो जुगारात 3.50 कोटी उडवल्यांचही त्यांनी म्हटलं. एका मागोमाग एक असे चार ट्विट करत संजय राऊत यांनी राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. या फोटोत दिसणारी व्यक्ती चंद्रशेखर बावनकुळे असल्याचा उल्लेख संजय राऊत यांनी कुठेही केला नाही. मात्र खुद्द बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांनी यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली. याच सगळ्यावर आता आजच्या सामनाच्या अग्रलेखात भाष्य करण्यात आलं आहे. बुंद से गयी वो… या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे.
भाजपचे कुळे यांची ‘मुळे’ मकाऊच्या कॅसिनो महालात पोहोचली. याचे समर्थन आज भाजपचे दुधखुळे करीत आहेत. मकाऊच्या कुळ्यांची पाठराखण करण्यासाठी इतरांवर बदनामीचे शेण उडवून धमक्या वगैरे दिल्या जात आहेत.
पण भाऊ एक मात्र नक्की, या लोकांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा मकाऊछाप जुगार करून राज्य बदनाम केले. कुळे येतील, कुळे जातील. त्यांच्या समर्थनार्थ झांजा वाजवणाऱ्यांनो, जो बुंदसे गयी वो हौदसे नही आती! महाराष्ट्रात आता एक जुगार बचावो मंत्रालय सुरू तर होणार नाही ना? भाजपच्या अमृतकाळात काहीही घडू शकते.
गेल्या आठ-दहा वर्षांत भारतीय राजकारणाचे गजकर्ण झाले आहे व गजकर्णाचा हा मूळ किडा भाजपचे राज्य देशात आल्यापासून वळवळू लागला आहे. राजकारणाचा स्तर गेल्या आठ-दहा वर्षांत किती घसरला हे पाहायचे असेल तर सध्या पाच राज्यांत सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांतील भाषणे समजून घ्यायला हवीत. इतरांचे ठीक आहे, पण पंतप्रधान आणि गृहमंत्री पदावरील व्यक्तीने तरी संयमाने आणि भान राखून बोलायला हवे.
राजकीय विरोधकांवर घसरायचे म्हणजे किती घसरायचे? एकंदरच सध्याच्या राजकारणात एकाला झाकावे आणि दुसऱ्याला काढावे अशी गत झाली आहे. सध्याचे राज्यकर्ते मात्र स्वतःचे झाकून दुसऱ्याचे वाकून पाहण्यात मग्न आहेत. महाराष्ट्र हे कधीकाळी सुसंस्कृत राजकारणाचे आदर्श राज्य होते. आता येथेही सब घोडे बारा टके अशीच स्थिती झाली आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. हे महाशय उद्धव ठाकरे, शरद पवारांपासून अनेक ज्येष्ठ, श्रेष्ठ नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन बोलतात व असे बोलणे ही एक विकृती आहे, असे राज्यातील देवेंद्र फडणवीस वगैरे लोकांना वाटत नाही. त्याच बावनकुळ्यांचा एक ‘बावनपत्ती’ फोटो समाजमाध्यमांवर झळकताच भाजपच्या गोटात छाती पिटण्याचा हुकमी कार्यक्रम सुरू झाला. तो अद्याप संपलेला नाही.
महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाचे हे अध्यक्ष सध्या चीनचा प्रदेश ‘मकाऊ’ येथे सहकुटुंब असल्याचे प्रदेश भाजपने जाहीर केले. ‘कुळे’ हे त्यांच्या कुटुंबासोबत कोठे असावेत हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न. पण कुळे हे मकाऊच्या एका हॉटेलातील ‘कॅसिनो’मध्ये मस्त बसून द्युत खेळात दंग असल्याचे हे छायाचित्र मनोरंजक आहे. कुळे यांच्या टेबलवर ‘पोकर्स’ नामक
चलन विखुरले आहे व त्यांना त्यांच्या चिनी मार्गदर्शक कुटुंबाने घेरले आहे. कुळे यांनी त्या खेळात त्या क्षणी किती ‘आकडा’ लावला आहे तो त्यांच्या टेबलावरील स्क्रीनवर झळकला आहे. हे छायाचित्र प्रसिद्ध होताच भाजपास इतके हडबडून जायचे कारण नव्हते.