गणेश थोरात, प्रतिनिधी-टीव्ही 9 मराठी, मुंबई | 09 डिसेंबर 2023 : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला आहे. आज सकाळी मुंबईतील जुहू बीचवर जात मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वच्छतेच्या कामाचा आढावा घेतला. स्वत: साफसफाईदेखील केली. यावर राऊतांनी निशाणा साधला आहे. सर्व नाटक बंद केली पाहिजेत. एकनाथ शिंदे यांनी सगळ्यात आधी आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची सफाई केली पाहिजे. त्यांनी भ्रष्टाचारी सफाई केली पाहिजे, असं संजय राऊत म्हणालेत. तीन घाशीराम कोतवाल सरकार चालवतायेत, असं म्हणत युती सरकारवरही संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय.
बीचवर जात सफाई करणं हे तुमचं काम आहे का? मुंबई महापालिका निवडणुका आपण घेत नाहीत. हे महापालिकेचे काम आहे नगरसेवकांचे काम आहे, ठाण्यामध्ये ,पुणे ,नाशिक 14 महानगरपालिका निवडणुका घ्या मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारचे सोग डोंग करण्याची वेळ येणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका ही ठाण्यातील नगरसेवकप्रमाणे आहे, असा थेट निशाणा संजय राऊतांनी साधला आहे.
महाराष्ट्रामध्ये घाशीराम कोतवालचं राज्य सुरू आहे. तीन घाशीराम कोतवाल राज्य करत आहे. घाशीराम कोतवालांचा पेशवे काळातील कार्यकाळ बघा… कशी लुटमार, कशी दरोडेखोरी केली जात होती. घाशीराम कोतवाल यांच्यावरती कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी होती. पुण्यामध्ये आणि त्यांनी ज्या पद्धतीने लुटमार सुरू करून आपल्या बॉसेसच्या पैसे पोचवायचा. सर्वच पोचवायचं. अशी ती सर्व कथा आहे घाशीराम कोतवाल महाराष्ट्रात नाटक खूप गाजलं आहे. ती एक विकृती होती. आज महाराष्ट्रात घाशीराम कोतवाल राज्य आहे, असं म्हणत शिंदे सरकारवर राऊतांनी टीका केली आहे.
ससून ड्रग्स प्रकरणांमध्ये धरपकड चालू आहे पकडापकडी चा लग्नाचा खेळ चालू आहेत ते सुद्धा नाटक बंद करा. कॅबिनेटमधील दोन मंत्र्यांचा थेट सहभाग यात आहे. ललित पाटील वर्षभर ससूनमध्ये ठेवण्यात आलं. त्याचे साम्राज्य होते. त्याला प्रोटेक्शन देण्याचं काम या दोघांनी केलं. पोलिसांनी त्यांच्यापर्यंत पोहोचावं. रविंद्र धंगेकर यांनी सांगितलं आहे. किरकोळ लहान मासे का पकडत आहेत? मंत्रिमंडळ दोघे आहेत. त्यांना हात लावून दाखवण्याची हिंमत दाखवा ना, असं आव्हान राऊतांनी दिलं आहे.