गणेश थोरात, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, मुंबई | 30 नोव्हेंबर 2023 : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की, आपल्या नेत्याने मुख्यमंत्री व्हावं. आम्हाला देखील वाटतं की, अजितदादा पवार यांनी राज्याचं मुख्यमंत्री व्हावं, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसंच अजित पवार कधी मुख्यमंत्री होतील, याची तारीखही संजय राऊत यांनी केली आहे.
येत्या 31 डिसेंबरपर्यंत आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय घेण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिल्या आहेत. त्याचाच धागा धरत हा निकाल आल्यानंतर शिंदे सरकार जाणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे 31 डिसेंबरनंतर मुख्यमंत्रिपद रिकामं होणार आहे. त्या जागेवर अजित पवार बसले तर आम्हाला देखील आनंद होईल, असं संजय राऊत म्हणालेत.
ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांच्या अटकेचा संजय राऊत यांनी निषेध केला. ही सुडाच्या भावनेतून कारवाई केली जात असल्याचा दावा राऊतांनी केला आहे. महाराष्ट्र राज्यात दोन कायदे आहेत. गद्दारांसाठी वेगळा कायदा असेल तर तसं जाहीर करा. राज्यपालांना आम्ही विचारतो आहोत. ज्या शब्दामुळे अटक झाली तो शब्द चित्रपटात आहे. दिघे साहेबांच्या तोंडी तो शब्द सेन्सॉरनं कापला का? दळवींना अटक करून तुम्ही आनंद दिघे यांचाही अपमान करत आहात, असं म्हणत राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली आहे.
पोलिसांवर दबाव असल्यानं जामीन प्रक्रियेत उशीर होतोय. हरकत नाही शिवसैनिक तुरुंगात जाऊन मोडत नाहीत. तुका म्हणे ऐशा नरा, मोजुनी माराव्या पैजारा, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. त्यापुढे जात मी म्हणतो की, हजार माराव्यात आणि एक मोजावं! आज तुकोबा असते तर त्यांना देखील यांनी देहू पोलीस कोठडीत पाठवलं असतं, असं म्हणत राऊतांनी टीकास्त्र डागलं आहे.