गणेश थोरात, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, मुंबई | 19 नोव्हेंबर 2023 : वर्ल्डकपचा अंतिम सामना आज होत आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा महामुकाबला दुपारी 2 वाजता सुरु होईल. त्याआधी विविध प्रतिक्रिया येत आहेत. वर्ल्ड कप फायनलवर बोलताना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. या देशात काहीही होऊ शकतं. कालपर्यंत हा खेळ होता. संपूर्ण देश त्यामध्ये सहभागी होता. आता भारतीय जनता पक्ष सहभागी झाले आहे. हा खेळ राहिला नाही. हा इव्हेंट झाला आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
आपण जाऊन पाहा गेल्या काही काळापासून भाजपचे लोक संध्याकाळी सांगतील मोदी होते म्हणून आम्ही जिंकलो. मोदी होते म्हणून अशी बॉलिंग पडली, अशी गुगली पडली. मोदींनींच मंत्र दिला अमित शाहा क्रिकेटच्या मागे उभे राहून मार्गदर्शन करत होते. हे लोक खेळालाही सोडायला तयार नाहीत, असं म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
क्रिकेटच्या इव्हेंटपासून ज्यांना आनंद घ्यायचा त्यांनी घ्या. पूर्वी मुंबई क्रिकेटची पंढरी होती. इकडचे उत्सव दिल्ली किंवा मुंबईत होत असत. कोलकाता ईडन गार्डनला होत असत. मुंबईतून संपूर्ण क्रिकेट हे अहमदाबाद हलवण्यात आलं. कारण त्यांना राजकीय इव्हेंट करायचा आहे. मोदी थे इसलिये हम जीत गये, मोदी है तो वर्ल्ड कप की जीत मुनकिन है, असं हे भाजपचे लोक बोलतील. पण भारतीय संघाचाला माझ्या शुभेच्छा आहेत. आपण जरुर जिंकू, असं संजय राऊत म्हणालेत.
2024 च्या लोकसभा निवडणुकीवरही संजय राऊतांनी भाष्य केलंय. सध्या आता मॅच फिक्सिंग आहे. म्हणून नाहीतर आत्ताच त्यांचा धुवा उडालेला आहे .बॅटिंग आणि मॅच फिक्सिंग वरती हे राज्य सुरू आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
निवडणूक आयोग ही खाजगी प्रॉपर्टी आहे. असे तपास यंत्रणा ईडी ,सीबीआय, निवडणूक आयोग ,राज्यपाल ज्यांना आपण घटनात्मक संस्था म्हणतो जे पक्षपाती असूनही स्वतंत्रपणे काम करावं, अशी आमची भूमिका ही देशाची भूमिका आहे. पण ते आता केंद्राच्या सत्ताधाऱ्यांच्या तालावरती नाचत आहे. त्यामुळे ती सध्या त्यांची ती खाजगी प्रॉपर्टी आहे. 2024 नंतर त्यांना स्वतंत्रपणे काम करावे लागेल, असंही संजय राऊत म्हणालेत.