नागपूर| 18 डिसेंबर 2023 : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीला आता वेग आला आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी अंतिम सुनावणीला आजपासून सुरुवात होत आहे. आजपासून पुढचे तीन दिवस सलग अंतिम सुनावणी घेतली जाणार आहे. दोन्ही गटाच्या वकिलांना दीड-दीड दिवस युक्तिवादासाठी वेळ देण्यात आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत आज युक्तिवाद करत आहेत. त्यामुळे लवकरच या प्रकरणाचा निकाल समोर येण्याची शक्यता आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल कधी येणार? वाचा…
मागच्या दीड वर्षांपासून शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अद्याप प्रलंबित आहे. या प्रकरणी आता सुनावणीला वेग आला आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणाचा निकाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे 20 डिसेंबरला अंतिम सुनावणी संपली. तर 10 जानेवारी 2024 रोजी नेमका निकाल कोणाच्या बाजुने लागणार? याकडे सर्वांचे लक्ष असेल.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठे बदल झाले. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. यामुळे ठाकरे विरूद्ध शिंदे असा संघर्ष उभा राहिला. अशातच ठाकरेंनी शिंदे यांच्या बंडाला कायदेशीर विरोध करण्याचं ठरवलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत ठाकरेंनी मागणी केली. ही लढाई कोर्टात गेली.
न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सूचना दिल्या आहेत. येत्या 31 डिसेंबरपर्यंत या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून निकाल देण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत. त्यामुळे या बाबत निकाल कधी समोर येतो हे पाहावं लागेल.
ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी या सुनीवणीवर प्रतिक्रिया दिलीय. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी पुन्हा विलंब होईल. असा निर्णय घेताना पक्षांतराची चीड असावी लागते. पण मला तरी तशी चीड विधानसभा अध्यक्षपदी बसेलेल्या व्यक्तीकडे दिसत नाही, असं म्हणत राऊतांनी या सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे.