मुंबई : सध्या महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलंय, ते ही महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातला गेला अशी बातमी आली तर दोन पक्षांमध्ये सुरु होते खडाजंगी, आरोपांच्या फैरी, कबुली आणि नुसतं स्पष्टीकरण वर स्पष्टीकरण, महाराष्ट्राची कोणतीही गोष्ट गुजरातला द्यायची नाही. आपली आपल्याकडेच असावी, प्रकल्पाच्या बाबतीत हे ठीक आहे, पण प्राण्यांच्या बाबतीत असं झालं तर, पण त्यातंही कुणाकडे कोणते प्राणी नसले, आणि त्याबदल्यात आपल्याला जंगलाचा राजा सिंह मिळाला तर, सिंह तसा जंगलाचा राजा आहेच, त्यामुळे तो राजाच असणार असल्याने, त्याच्याशी राजकारण करुन फायदा नाही, तसंच प्राण्यांच्या विषयातही राजकारण नको, त्याचा काहीही फायदा नाही, पण मूळ विषय काय आहे, तो जरा समजून घ्या, खाली सांगतोय विस्तृत स्वरुपात…
हो हे खरंय की मुंबईचा वाघ गुजरातला जाणार आहे, पण त्या बदल्यात महाराष्ट्राला मिळणार आहेत जंगलाचे २ राजे, महाराष्ट्राच्या राजकारणालाही सवय आहे, एकाच वेळी २ राजांची. तसेच गुजरातमधून जंगलाचे २ राजे महाराष्ट्रात आले तर वाईट काय?
हे २ सिंह गुजरातमधून महाराष्ट्रात येतील, ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाहायला मिळतील, अशी माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे, याबाबत केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे, या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळणार आहे.
याबाबतीत महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवर हे गुजरात दौऱ्यावर असताना, गुजरातचे वनमंत्री जगदीश विश्वकर्मा यांच्याशी त्यांची चर्चा झाली आणि त्यांनी या कराराची माहिती दिली.