बदलापूर ते पनवेल प्रवास अवघ्या 10 मिनिटांत शक्य, काय आहे योजना?

| Updated on: Sep 05, 2024 | 1:51 PM

बडोदा ते जेएनपीटी हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा महत्वाचा टप्पा आहे. मुंबई ते दिल्ली एक्सप्रेसवे हा मुंबई ते पुणे एक्सप्रेसवे प्रमाणे संपूर्ण एक्सेस कंट्रोल हायवे असून त्याचा खर्च जमीन संपादनासह 1,00,000 कोटी रुपये इतका आहे. हा प्रकल्पाचे काम 8 मार्च 2019 रोजी सुरु झाले आहे.

बदलापूर ते पनवेल प्रवास अवघ्या 10 मिनिटांत शक्य, काय आहे योजना?
Follow us on

मुंबई ते दिल्ली एक्सप्रेसवेचा एक भाग असलेल्या बडोदा ते जेएनपीटी महामार्गाचे काम सध्या पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात सुरू आहे. बदलापूर ते पनवेल असा बोगदा हा या महामार्गातला सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. यासाठी बदलापूर ते पनवेल असा तब्बल सव्वाचार किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात आला आहे. हा बोगदा 22 मीटर रुंद असून त्यात चार मार्गिका असणार आहेत. या बोगद्याला आतमध्ये काही ठिकाणी इंटरचेंज सुद्धा देण्यात आले आहेत. या बोगद्याच्या कामासाठी दोन वर्षांचा कालावधी अपेक्षित असताना प्रत्यक्षात अवघ्या 15 महिन्यातच बोगद्याचं काम पूर्ण झाले आहे. सध्या बोगद्यांच्या आत कॉंक्रीट प्लॅस्टरिंगचं काम सुरू असून त्यानंतर रस्ते आणि अन्य कामं केली जाणार आहेत.

या बोगद्याचे काम ठरलेल्या वेळेआधीच पूर्ण झाले असल्याने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही कौतुक केले आहे. दरम्यान, बडोदा आणि जेएनपीटीला जोडणारा हा महामार्ग बदलापूर शहराजवळून जावा यासाठी मुरबाड विधानसभेचे भाजपाचे आमदार किसन कथोरे यांनी पाठपुरावा केला होता. या महामार्गावरील महत्त्वाचा टप्पा असलेल्या या बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आमदार किसन कथोरे यांनी बोगद्याची पाहणी करून कामगारांचे कौतुक केले आहे. हा महामार्ग सुरू झाल्यानंतर या बोगद्यामुळे बदलापूर ते पनवेल हा प्रवास अवघ्या 10 मिनिटात करता येणे शक्य होणार आहे. तर बदलापूर ते मुंबई हा प्रवास अटल सेतू मार्गे अवघ्या 30 ते 40 मिनिटात करता येणार आहे. नवी मुंबई विमानतळाला सुद्धा या महामार्गामुळे मोठी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

कमर्शियल हब होणार

या महामार्गावरून जेएनपीटी बंदराकडे मोठ्या प्रमाणात मालवाहतूक सुद्धा होणार आहे. त्यामुळे बदलापूर आणि आसपासच्यापट्ट्यात या महामार्गाला लागून आर्थिक कमर्शियल हब आणि गोदामे सुद्धा उभे राहू शकणार आहेत. त्यामुळे स्थानिकांच्या रोजगारात मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे बडोदा जेएनपीटी महामार्ग ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात खऱ्या अर्थाने समृद्धी आणणार आहे असे मुरबाड विधानसभेचे भाजपा आमदार किसन कथोरे यांनी सांगितले.