दिनेश दुखंडे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 05 डिसेंबर 2023 : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. शिंदे सरकारच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. पीक विमा घोटाळा वेगळा विषय आहे. त्यावर बोलेनच. महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं. तेव्हा एक अधिवेशन झालं होतं. त्याच अधिवेशनात मी मुख्यमंत्री म्हणून शेतकऱ्यांचं दोन लाखाचं कर्ज माफ केलं होतं.त्यामुळे शेतकरी तारला होता. कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांनी आपली अर्थव्यवस्था तारली होती. थोतांडं नाटकं बंद करा. कर्जमुक्ती करा. घोषणा करून भुलभुलैय्या करू नका, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
शेतकऱ्यांची अवस्था सध्या फार वाईट आहे. ‘शासन आपल्या दारी’ म्हणून जो बोगसपणा सध्या सुरु होता तो आता बंद पडला आहे. कारण कुणी त्यांना दारात पण उभं करायला तयार नाहीये, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार घणाघात केला आहे. ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमावर टीका करताना ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष केलं आहे. सरकारच्या कामकाजाच्या पद्धतीवर टीका केली आहे.
काही मुद्द्यांना स्पर्श करता येईल. काही मुद्दे जाहीर सभेतून मांडेल. चार पाच राज्यांच्या निवडणुका आहेत. राज्यातील शेतकऱ्यांची दैनावस्था अवकाळी, दुष्काळी आणि नापिकीमुळे तिकडे सरकार लक्ष देत नाही. मुंबईच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर येणार आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.
बाळासाहेब एकमेव हिंदूहृदय सम्राट…. गद्दार हृदयसम्राटांबाबत बोलत नाही. बाळासाहेबांचा मतांचा अधिकार काढला होता. त्यात काही बदल झाला का असा सवाल मागितला होता. पण त्यांनी त्यावर काही उत्तर दिलं नाही. याचा अर्थ आम्ही धर्माच्या नावावर मते मागायची का. आम्हीही धर्माच्या नावावर मते मागू तेव्हा तुम्हाला कारवाई करता येणार नाही. हरहर महादेव, जय शिवाजी जय भवानीच्या नावाने मते मागू. तुम्हाला हे मान्य आहे म्हणूनच आम्ही तसं करू, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.