दिनेश दुखंडे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 05 डिसेंबर 2023 : धारावीकरांना 500 चौरस फुटाचे घर द्या, अशी मागणी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ‘शिवालय’ या नव्या कार्यालयाचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. ठाकरे गटाचं हे राज्य संपर्क कार्यालय असणार आहे. या उद्घाटन प्रसंगी बोलताना ठाकरेंनी ही मागणी केलीय. धारावीकरांना सांगतो तुमच्यासाठी मी आलो आहे. तुमच्या जागा बळकावू देऊ नका. कुणी गुंडागिरी करायला आले तर शिवसेनेकडे या, आम्ही बघतो. सरकारला सांगतो तुम्ही मिंधे होऊ नका. तुम्ही काही दिवस आहात. इथे काही झालं तरी सर्वोच्च न्यायालय आहे. कुणाची तरी धुणीभांडी घासण्यासाठी काहीही करू नका. मी सर्व मुंबईकरांना आवाहन करत आहे. तुम्ही मोर्चात या. मराठी माणसाने मोर्चात आलं पाहिजे. मुंबई प्रेमीने यावं, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा, हे सांगण्यासाठी आम्ही अदानीच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत. मुंबईकरांना अमाप वीज येत आहे. अदानीकडेच वीज कंपनी आहे. या सर्वांचा सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आली आहे. तुकडा पाडण्याची वेळ आली आहे. आम्ही विकासाच्या आड नाही. आम्ही आड असतो तर आम्ही विकासाची कामे सुरू केली नसती. महापालिकेत आमची सत्ता होती, आम्ही लोकांचा विकास करू, असं शब्दही उद्धव ठाकरे यांनी धारावीवासीयांना दिला.
धारावीकरांचं पुनर्वसन जिथल्या तिथे झालं पाहिजे. माहीम निसर्ग उद्यान, रस्ते त्यात धरले आहे का. या गोष्टी स्पष्ट पाहिजे. प्रकल्प करताना सूचना आणि हरकती जनतेकडून घेतल्या जातात. सरकार म्हणते आम्ही हमी देऊ. पण तुम्ही सूचना आणि हरकती घेतल्याच नाही तर हमी कसली घेणार आहे. तसं नाही झालं तर आम्ही आमची रस्त्यावरची ताकद दाखवू. प्रशासनात आम्ही नसेल. पण आमची ताकद रस्त्यावरची आहे, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
एवढ्या मोठ्या वस्तीला पाणी कुठून आणणार. नियोजन शून्यतेमुळे मुंबईकरांचा जीव घुसमट आहे. मुंबईत यापूर्वी कधीच एवढं प्रदूषण पाहिलं नाही. हे सरकार केवळ कंत्राटदारांसाठी काम करत आहे. रस्त्याचं कंत्राट असेल, आणखी कसली असते. प्रदूषण हे नियोजन शून्य कामामुळे होत आहे. कंत्राटदारांचं हे सरकार आहे. मुंबईचे तीन प्रकल्प यांच्या घशात घालण्याचं काम सरकार करत आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.