दिनेश दुखंडे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 30 डिसेंबर 2023 : लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशातच जागा वाटपातची चर्चा जोर धरू लागली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. आघाडीत बिघाडी होऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. अजित पवार यांचे खंदे समर्थक संजोग वाघेरे यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
लोकसभेचे पडघम वाजू लागले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे 30 एप्रिलच्या आत लोकसभेच्या निवडणुका होतील. यांना कुणीतरी सांगितलं आहे की, 30 एप्रिलपर्यंत निकाल लागला तर तुमचं काहीतरी ठीक होईल. असं कुणीतरी सांगितल्याचं माझ्या कानावर आलं. आमच्या महाविकास आघाडीचं जागा वाटप सुरळित होईल. राष्ट्रवादी आणि आमची व्यवस्थित बोलणी सुरू आहे. जवळपास ही बोलणी झाली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक झाली. तेव्हा काँग्रेसशी बोलणी झाली आहेत. मी स्वत: मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्याशी बोललो आहे. पुढे काही दिवसात दिल्ली आमची पुन्हा बैठक होईल आणि आमचं सगळं सुरळित होईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. वंचितबरोबर सुद्धा आमची बोलणी सुरु आहे. येत्या दोन दिवसात संजय राऊत- ठाकरे गटाचे दोन नेते आणि वंचितच्या नेत्यांमध्ये बोलणी होईल. एकत्र बैठक होईल, असंही ठाकरेंनी सांगितलं.
राम मंदिराचं राजकारण होऊ नये. पण भाजपने राम मंदिराच्या उद्घाटनाचा इव्हेंट केला आहे. 22 जानेवारीलाच अयोध्येत दर्शनाला जायला हवं, असं काही नाही. राम मंदिर नव्हतं तेव्हा पूजा सुरूच होती. राम मंदिर नसतानाही आम्ही अयोध्येत गेलो. लाखो भाविकही अयोध्येत जात होते. माझ्या मनात येईल तेव्हा मी अयोध्येला जाईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.