वॉशिंगटन : 26/11 च्या मुंबई हल्ल्याला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. या हल्ल्याच्या आठवणी आजही प्रत्येक मुंबईकराच्या काळजात धडकी भरवतात. 10 वर्षात जखमींच्या जखमा जरी भरल्या असल्या, तरी त्या रात्रीचा तो थरारक अनुभव त्यांना आजही झोपू देत नाही.
2008 मध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी शहरात एकूण दहा ठिकाणी हल्ले केले. या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी निरपराध लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला, ग्रेनेड फेकले. शिवाय माझगांव डॉक येथे एक बॉम्बस्फोट आणि विलेपार्ले येथे एका टॅक्सीमध्ये स्फोट केला होता. या दहशतवादी हल्ल्यात 166 लोक मारले गेले, तर शेकडो जखमी झाले होते. या दहशतवादी हल्ल्यात मुंबई पोलिसांच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक पोलिसांना वीरमरण आलं.
अमेरिकी तत्वज्ञ, माजी राजदूत आणि अधिकाऱ्यांच्या मते, जर 26/11 सारखा हल्ला परत झाला, तर भारत-पाकिस्तानात युद्ध होऊ शकतं. मुंबई हल्ल्याला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर हे सांगण्यात आले.
पाकिस्तानातील दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’च्या 10 दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात 166 लोकांनी आपला जीव गमावला होता, यात काही अमेरिकी नागरीक देखील मृत्यूमुखी पडले. या 10 दहशतवाद्यांपैकी नऊ दहशतवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातलं, तर अजमल कसाबला पोलिसांनी जीवंत पकडलं. नंतर सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती.
मुंबई हल्ल्याला 10 वर्ष होऊनही पाकिस्तानात या संबधी कुठल्याही संशयितावर कारवाई करण्यात आलेली नाही. यावरुन हेच दिसून येत की हे प्रकरण पाकिस्तानने गांभिर्याने घेतले नाही. अमेरिकन इंटेलिजेंस एजन्सी सीआयएचे माजी अधिकारी ब्रूस रीडल यांनी पीटीआईला सांगितले की,
“26/11 हल्ल्याच्या पीडितांना अद्यापही हल्ल्याचे मुख्य आरोपी आणि पाकिस्तानी इंटेलिजन्स एजन्सी आयएसआयविरोधात न्यायाची प्रतिक्षा आहे, पण पाकिस्तानात हे शक्य होईल असे वाटत नाही.”
रीडेल यांच्या मते जर या प्रकारचा हल्ला पुन्हा झाला तर दोन्ही देशांमध्ये युद्ध निश्चित आहे.
अमेरिकेतील पाकिस्तानचे माजी राजदूत आणि सध्या हडसन इन्स्टिट्यूटमध्ये दक्षिण व मध्य आशियाचे सिनीअर फेलो आणि संचालक हुसेन हक्कानी यांनी सांगितले की, अमेरिका-पाकिस्तानमधील संबंध पाहता भारतात जर परत असा दहशतवादी हल्ला झाल्यास या परिस्थितीला कसे हाताळले जाईल हे सांगता येत नाही. 26/11 हल्ल्याच्या मुख्य आरोपींविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन पाकिस्तानाने निभावले पाहीजे, असेही हक्कानी यांनी सांगितले.
या हल्ल्या दरम्यान नॅशनल सिक्योरिटी ऑफ द व्हाइट हाऊसमध्ये दक्षिण आशियाचे संचालक असलेले अनीश गोयल यांनी सांगितले की, ‘त्यावेळी भारत-पाकिस्तानातील युद्धाचे वातावरण आमच्या प्राथमिक चिंतेपैकी एक होते, जे आम्ही थांबवण्याच्या प्रयत्नात होतो’.
ओबामा प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘जर त्या प्रकारचा हल्ला पुन्हा झाला तर दोन्ही देशांत युद्ध होण्याची शक्यता आहे’.
सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सरकार पाकिस्तानच्या विरोधात कठोर भूमीका घेण्यास पुढे-मागे बघत नाही, सर्जिकल स्ट्राईक हे देखील त्यापैकीच एक होतं, असेही त्यांनी सांगितले.