मुंबई : राज्यात एकूण 140 गोविंदा जखमी झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला आहे. गोविंदा उत्सवात मुंबईत जखमी झालेल्या 119 गोविंदांपैकी 93 जणांवर उपचार करून घरी सोडण्यात आले, तर 26 जणांना रुग्णालयात दाखल केले आहे.
राज्यातील पूरस्थितीमुळे शहर-उपनगरातील अनेक आयोजकांनी यंदा गोविंदा उत्सव रद्द केले होते. त्यामुळे लाखोंची बक्षिसे मिळविणारा गोविंदाही नाराज झाला होता. काल (24 ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजेपर्यंत या उत्सवात मुंबई शहर-उपनगरातील 119 तर ठाण्यातील 21 असे एकूण 140 गोविंदा जखमी झाले होते. दरम्यान, रायगडमध्ये पाचव्या थरावरून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला.
गोविंदा उत्सवात 14 वर्षाखालील गोविंदांना उत्सवात सहभाही होण्याची परवानगी नसतानाही मुंबई उपनगरात पाच बालगोविंदा जखमी झाले. त्यातील दोन जणांना रुग्णालयात दाखल केले असून तिघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, दहीहंडी उत्सवादरम्यान अनेक गोविंदांनी वाहतुकीचे नियम मोडीत काढले होते. या सर्वांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या 1503 गोविंदा, ट्रिपल सीट 194 आणि ड्रंक अँड ड्राईव्ह बाईक चालवणाऱ्या 31 गोविंदावर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.