डोंबिवली : दहावीत शिकणारा डोंबिवलीतील 15 वर्षीय मुलगा खाडीत पडल्याची घटना घडली. अभिनव झा असं या मुलाचं नाव असून तो डोंबिवली पश्चिमेला राहतो. प्रत्यक्षदर्शींच्या मते, अभिनव सेल्फी काढण्याच्या नादात खाडीत पडला. तर कुटुंबीयांच्या मते, अभिनव किंवा त्याच्या मित्राकडे मोबाईलच नव्हता. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत असून अभिनवचा शोध सुरु आहे.
दहावीत शिकणाऱ्या अभिनवची ट्युशनमध्ये परीक्षा होती. मात्र परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने अभिनव त्याच्या दोन मित्रांसह दिवा-वसई रेल्वेमार्गाजवळील सात पूल या खाडीवरील पुलावर फिरायला गेला.
स्थानिकांच्या मते, तिथे सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात असताना अभिनवचा तोल जाऊन तो खाडीत पडला आणि बुडाला. यामुळे भेदरलेल्या त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या दोन मित्रांनी त्याच्या घरी येऊन याबाबत माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेड स्थानिकांच्या मदतीने खाडीत शोधकार्य सुरू करण्यात आलं. मात्र अभिनव अजूनही सापडलेला नाही.
अंधार पडल्याने शनिवारी रात्री शोधकार्य थांबवण्यात आलं असून रविवारी पुन्हा त्याचा शोध घेतला जाणार आहे. दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी अभिनव सेल्फी काढताना खाडीत पडल्याचा दावा केला असला, तरी त्याच्याकडे मोबाईलच नसल्याची माहिती त्याच्या घरच्यांनी दिली आहे. त्यामुळे नेमका तो पाण्यात पडला कसा? याबाबत संभ्रमाचं वातावरण आहे.