मुंबई: सोशल मीडियाच्या हट्टापायी एका किशोरवयीन मुलीने बाथरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. मुंबईतील भोईवाडा परिसरात ही धक्कादायक घटना घडली. या मुलीला टिक-टॉकवर व्हिडीओ अपलोड करण्याची सवय होती. तिला त्यापासून रोखल्याने 15 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र मुलीच्या घरच्यांनी दिलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. या मुलीला यूट्यूबवर आत्म्यांबाबत व्हिडीओ पाहायची सवय होती. त्यातूनच तिने आत्महत्या केल्याचा त्यांचा अंदाज आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
टिक-टॉक अॅपच्या हट्टापायी एका 15 वर्षीय मुलीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील भोईवाडा इथं समोर आली. स्वत:चे वेगवेगळे व्हिडीओ टिक-टॉक या अॅपवर टाकायची सवय तिला जडली होती. वडिलांच्या वाढदिवसाचा व्हिडीओ करून, तो सोशल मीडियावर अपलोड करत होती. मात्र हे पाहून आजीने तिला व्हिडीओ टाकण्यास विरोध केला. याच रागात मुलीने बाथरुममध्ये गळफास लावून स्वत:चे आयुष्य संपवलं.
15 वर्षीय नेहा आई वडिलांसोबत भोईवाडा इथं राहत होती. वडील खासगी कंपनीत कामाला आहेत, तर नेहा शाळा शिकत होती. मित्र-मैत्रिणींप्रमाणे तीनेही मोबाईलमध्ये टिक-टॉकवर व्हिडीओ टाकण्यास सुरुवात केली. त्याला मिळणाऱ्या कमेंट्समुळे व्हिडीओ टाकण्याचे प्रमाण वाढले. शुक्रवारी वडिलांच्या वाढदिवस साजरा झाला. तेव्हा नेहा सतत मोबाईलवर असल्याचे पाहून आजी तीला ओरडली आणि व्हिडीओ टाकू नको, असं सांगून आजीने तीच्या हातून मोबाईल काढून घेतला.
नेहा रडत रडत बाथरूममध्ये पोहोचली आणि ओढणीच्या साहाय्याने तिने गळफास घेतला. बराच वेळ झाला, तरी ती न परतल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी बाथरूमकडे धाव घेतली. आतून प्रतिसाद न आल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. तिला रुग्णालयात दाखल केले. तेथे दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर रविवारी रात्री तिने प्राण सोडले.
याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. कारण घटनास्थळावरुन सुसाईड नोट मिळाली नाही.
आत्म्यांचे व्हिडीओ
जेव्हा तिच्या पालकांना याबाबात विचारणा करण्यात आली, तेव्हा त्यांनी नेहाने टिक-टॉकमुळे नाही, तर यू ट्यूबवरील आत्म्याशी संबंधित व्हिडीओ पाहून आत्महत्या केल्याचा दावा केला आहे. कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिल्याने हे व्हिडीओ नेमकं काय आहेत, त्याचा आम्ही शोध घेतला, तेव्हा यूट्यूबवर अनेक व्हिडीओ सापडले. या व्हिडीओत अनेक तरुण तरुणी शरिरातून प्राण बाहेर गेल्यानंतर कसं वाटतं, काय होतं, याबाबत आपला अनुभव सांगताना दिसतात.
आत्म्याबाबत अनेक व्हिडीओज नेहा पाहायची, त्यात ती पार बुडाली होती, तिने यापूर्वीही शरीर त्याग करण्याचा प्रयत्न केल्याचं बोलंल जातंय. पोलिसांनी तिचा मोबाईल फोन ताब्यात घेत तीने पाहिलेल्या व्हिडीओची समरी पाहण्यास सुरुवात केली आहे. यातून काही निष्पन्न होणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
या घटनेनंतर प्रत्येत पालकांनी त्यांच्या मुलांबाबात वेळीच सतर्क राहण्याची गरज आहे. कारण कुमारवयात मुलं मोबाईल, यूट्यूब आणि सोशल मीडियाच्या नादाला लागून टोकाचं पाऊल उचलत आहेत. त्यांना योग्य मार्ग दाखवणं पालकांचं काम आहे.