गजानन उमाटे, भूषण पाटील, योगेश बोरसे, आनंद पांड्ये, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील सुमारे 18 लाख सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून हे कर्मचारी संपावर गेले आहेत. या संपामुळे शासकीय रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, नगरपालिका, जिल्हा परिषदा, तहसीलदार कार्यालये, यासह अनेक सरकारी विभागांचे कामकाज जवळपास ठप्प झाले आहे. परिचारिका, नर्सेस, वॉर्ड बॉयसह इतर आस्थापनातील शासकीय कर्मचाऱ्यांनी आपआपल्या कार्यालयाबाहेर येऊन जोरदार घोषणाबाजीही सुरू केली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, संभाजीनगर, नागपूरसह राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. रुग्णांकडे पाहण्यासाठी कोणीही नसल्याने रुग्णांचे हाल होताना दिसत आहेत.
जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्य सरकारी, फोर्थ क्लासेस डॉक्टर्स मोठ्या प्रमाणात आज संपावर गेलेले आहेत. जुनी पेन्शन योजना जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत कामावर येणार नाही, असा निर्णय या डॉक्टरांनी घेतला आहे. नर्सेस आणि परिचारिकाही या संपात सहभागी झाल्याने सायन हॉस्पिटलमध्ये सन्नाटा पसरलेला आहे. परिणामी रुग्णांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत. मुंबईतील सायनसह अनेक रुग्णालयात हेच चित्र दिसत आहे. तर पुण्यातील ससून रुग्णालयातील नर्सेसही संपात सहभागी झाल्या आहेत. ससून रुग्णालय परिसरात परिचारिकांनी आंदोलन सुरू केलं आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्य सरकारी, निम सरकारी, जिल्हा परिषद, महसूल, महानगरपालिका आदींसह शासनातील सुमारे 32 विभागांचे अधिकारी-कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. या संपात पुणे जिल्ह्यातील 68 हजार अधिकारी-कर्मचारी संपावर आहेत. शासनाकडून मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने बेमुदत संप पुकारला आहे. शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, कृषी, सहकार, कारागृह, आरोग्य, साखर संकुल, जिल्हा परिषद, महसूल, जिल्हाधिकारी कार्यालय, नोंदणी विभाग, भूमी अभिलेख, पालिका, शिक्षक-शिक्षकेतर, नगरपालिका, आरटीओ, आशा वर्कर्स आदींसह सुमारे 32 विभागातील कर्मचारी या बेमुदत संपात सहभागी झाले आहेत.
जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी
बालवाडी, अंगणवाडी, आशा वर्कर्स, बदली कर्मचारी यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत घ्यावे
रिक्त जागा 100 टक्के भरा
लिपिक संवर्गासह समान कामाला, समान दाम द्या
निवृत्तीचे वय 60 करा
महिला कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे लाभ आणि सवलती द्या
नागपूर शासकीय रुग्णालय आणि वैद्यकिय महाविद्यालयातील कर्मचारीही संपावर गेले आहेत. मेडीकल कॉलेजमधील 1100 परिचारिका संपावर गेल्या आहेत. त्यामुळे नागपूर मेडीकलमधील रुग्णसेवेवर संपाचा परिणाम झाला आहे.
कोल्हापुरात अनुदानित शाळा महाविद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षकेतर कर्मचारी देखील या आंदोलनात सहभागी आहेत. परिणामी कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील या आंदोलनाचा परिणाम पाहायला मिळतोय. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक या आंदोलनात सहभागी असल्याने विद्यार्थ्यांनी देखील महाविद्यालयांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे जुनिअर कॉलेजच्या वर्ग खोल्या रिकाम्या दिसत आहेत. जिल्ह्यातील 80 हजार कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले असून जुन्या पेन्शन बाबतचा पहिला मोर्चा कोल्हापुरातूनच निघाल्याने जिल्ह्यात या बेमुदत संपाचा परिणाम सर्वाधिक पाहायला मिळतोय. सरकारकडून कारवाईचा इशारा दिला गेला असला तरी आम्ही संपावर ठाम आहोत असा निर्धार संपात सहभागी शिक्षकांनी व्यक्त केलाय.
संभाजीनगर जिल्ह्यातील घाटी रुग्णालयातील 800 नर्स संपावर गेल्या आहेत. या सर्व नर्स रुग्णालयातील ओपन स्पेसवर जमल्या आहेत. राज्य सरकार विरोधात नर्सेसची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. 800 नर्सेस संपावर गेल्यामुळे घाटी रुग्णालयातील रुग्णसेवेला जबरदस्त फटका बसला आहे. नर्सेस संपावर गेल्याने संपूर्ण मराठवाड्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे.
नागपुरातील काही शाळांमध्ये संपाचा परिणाम जाणवत आहे. नागपुरातील काही शाळा, महाविद्यालयातील शिक्षक संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे शिक्षक शाळेत आलेत. परिणामी विद्यार्थ्यांनीही घरचा रस्ता धरल्याचं दिसून आलं आहे. नागपूर मनपाच्या काही शाळा आणि अनुदानीत शाळांमध्येही संपाचा परिणाम दिसत असून संपामुळे शाळेत शुकशुकाट निर्माण झाला आहे.