मीरा भाईंदर : शिवसेनेतील 18 नगरसेवकांनी (Shiv Sena corporators) शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. अनेक महापालिका, नगर परिषद तसेच स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्वसामान्य नागरिक या सर्वांनी नव्या सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आमची सर्वसामान्यांना न्याय देण्याची जी जबाबदारी आहे, ती योग्य प्रकारे पाडणार आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले आहेत. शिवसेनेच्या खासदारांशी संपर्क झालेला नाही. मात्र आम्हाला सगळीकडूनच पाठिंबा मिळत आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी त्यांनी लवकरच मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. दिशाभूल करणारी वक्तव्ये करत असतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे. 166पेक्षा जास्त आमदार (MLAs) आमच्याकडे आहेत. आमचे सरकार स्थिर असून आम्ही सामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहोत, अशी माहिती शिंदे यांनी दिली.
मीरा भाईंदर महापालिकेची शिवसेनेची संपूर्ण जबाबदारी ही आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे होती. मात्र सरनाईकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने शिवसेनेने त्यांना हटवले होते. आता सरनाईक यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांसह शिंदे गटाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या ज्वलंत हिंदुत्वाची भूमिका आम्ही पुढे घेऊन जात आहोत. त्यामुळेच या 18 नगरसेवकांनी समर्थन दिल्याचे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. आता 18 नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. पहिल्या टप्प्यानंतर आता हळूहळू आणखी नगरसेवक आणि इतर नेते पाठिंबा देणार असल्याचेही एकनाथ शिंद म्हणाले आहेत.
अनेक महापालिका, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, सामान्य नागरिक, या सगळ्यांना सरकारला मान्यता दिलेली आहे. मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यांना त्यांच्या विचारांचे सरकार मिळाले आहे. तर समर्थन देणाऱ्या या 18 नगरसेवकांचे स्वागत करतो आणि मनापासून धन्यवाद देतो. राज्यात ज्या काही घडामोडी पाहत आहोत, त्या सांगण्याची गरज नाही. हे सरकार जी भूमिका घेऊन स्थापन झाले आहे, ते सर्वसामान्यांच्या न्यायाचे सरकार आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.