मुंबई : यंदाचा (Ganesh Festival) गणेशोत्सव निर्बंधमुक्त झाला असला तरी, गणेश भक्तांनीच स्वत:हून काही निर्बंध लादून घ्यावेत असाच काय तो उत्सवाचा शेवट झाला. त्याला कारणही तसेच आहे. राज्यात (Ganesh Visarjan) गणेश विसर्जन दरम्यान तब्बल (21 Death) 21 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटना वेगवेगळ्या कारणाने घडल्या असल्या तरी विसर्जन दरम्यान गणेश भक्तांनी काळजी घेणेही तेवढेच गरजेचे आहे. या घटनांबाबत पोलिस प्रशासनाने माहिती दिली असून 21 पैकी 15 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. विदर्भात अधिक घटना घडल्याचे समोर आले आहे. वर्धा जिल्ह्यातील सांगवी ह्या एकाच गावातील तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे.
गणेश विसर्जन दरम्यान गणेश भक्तांचा उत्साह हा शिगेला पोहचला होता. असे असले तरी राज्यात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात होता. त्यामुळे शहरी भागात नाही पण ग्रामीण भागातच अधिकच्या दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये वर्धा जिल्ह्यातील सांगवी येथे तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर याच जिल्ह्यातील देवळीत एकाला जलसमाधी मिळाली आहे. यवतमाळ जिल्ह्यांमध्ये दोघेजण,नगर जिल्ह्यात दोघांचा तर जळगाव जिल्ह्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.
शहरी भागात उत्साह अधिकचा असला तरी नियमांचे पालन केले जाते. शिवाय मूर्ती विसर्जन ठिकाणी पोलिस बंदोबस्तही तैनात केलेला असतो. ग्रामीण भागात मात्र, गणेश भक्तांकडून नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. तर शहराप्रमाणे पोलिस बंदोबस्तही नसतो. त्यामुळे ग्रामीण भागात गर्दी कमी असूनही अशा दुर्घटना ह्या घडतातच.
केवळ विसर्जन दरम्यान बुडूनच नव्हे तर इतर कारणांमुळेही गणेश भक्तांना जीव गमवावा लागला आहे. नागपुरातील शक्करदरा परिसरात झालेल्या रस्ते अपघातामध्ये चौघांना जीव गमवावा लागला. ठाण्यातील कोलबाड परिसरात पावसामुळे गणेश मंडपावरच झाड कोसळले यामध्ये 55 वर्ष व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. हे कमी म्हणून की काय, रायगड येथील पनवेल येथे विजेच्या धक्क्याने 9 वर्षाच्या मुलीसह इतर 11 जण हे जखमी झाले होते.
गणेश विसर्जनाच्या मिरवणूक वेळी काही ठिकाणी कायद्याचेही उल्लंघन झाले. यामध्ये मुंबईतील प्रभादेवी परिसरात शिंदे गट आणि शिवसेनेचे पदाधिकारी आमने-सामने आले होते. अहमदनगरमध्येही या दोन गटातीलच पदाधिकारी भिडले होते. जळगावमध्ये महापौर यांच्या बंगल्यावर काही जणांनी तुफान दगडफेक केली होती.