ठाणे: अंबरनाथ पोलिसांनी आठ महिन्यांपूर्वी झालेल्या एका हत्येच्या प्रकरणाचा छडा लावला आहे. या गुन्ह्याच्या तपासात देशात पहिल्यांदाच थ्री डायमेंशन सुपर इम्पोझिशन या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. मुंबईच्या केईएम हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमच्या साहाय्यानं या गुन्ह्याचा छडा लावण्यात आला.
अंबरनाथच्या जावसई डोंगरावर एप्रिल महिन्यात शीर कापलेला एक अज्ञात मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहापासून काही अंतरावर त्याचं शीर सापडलं होतं. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यानं त्याची ओळख पटवणं आणि या गुन्ह्याचा तपास करणं हे पोलिसांसाठी मोठं आव्हान होतं. मात्र अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पाटील यांनी यात पोलिसांनी केईएम हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर हरीश पाठक यांची मदत घेतली. पाठक यांनी मृतदेहाच्या कवटीच्या साहाय्याने ‘थ्री डायमेंशन सुपर इम्पोझिशन’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मृत व्यक्तीचा ढोबळ चेहरा तयार केला.
या चेहऱ्याच्या साहाय्याने शोध घेत असताना मृत व्यक्ती हा अंबरनाथच्या महेंद्रनगर भागातला बिन्द्रेश प्रजापती असून तो एप्रिल महिन्यापासून बेपत्ता असल्याचं समोर आलं. त्यामुळं त्याची पत्नी सावित्री प्रजापती हिच्याकडे चौकशी करून पोलिसांनी तिला अटक केली. यानंतर ही हत्या अनैतिक संबंधांतून घडल्याचं उघड झालं. सावित्री हिचे किसनकुमार कनोजिया याच्याशी अनैतिक संबंध होते. त्यात पती अडसर ठरत असल्यानं या दोघांनी राजेश यादव या अन्य एका सहकाऱ्याच्या मदतीनं पतीचा काटा काढल्याचं निष्पन्न झालं.
याप्रकरणी या तिघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्यांना 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, अशाप्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने देशात पहिल्यांदाच एखाद्या गुन्ह्याचा तपास झाला असून त्यामुळं पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक होतं आहे.