कावळ्याच्या वेगापेक्षाही अधिक वेगाने कार धावणार; मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं उद्या लोकार्पण

| Updated on: Jan 11, 2024 | 6:18 PM

देशातील सर्वात लांब सागरी सेतूचं उद्या लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सागरी सेतूचं लोकार्पण होणार आहे. मुंबई- ट्रान्स हर्बर लिंक म्हणून या सेतूला ओळखलं जातं. तसेच शिवडी न्हावा शेवा सागरी सेतू म्हणूनही या सेतूची ओळख आहे. तर राज्य सरकारने या सागरी सेतूला अटल सागरी सेतू असं नाव दिलं आहे. या सागरी सेतूमुळे प्रवाशांचा मोठा वेळही वाचणार आहे.

कावळ्याच्या वेगापेक्षाही अधिक वेगाने कार धावणार; मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं उद्या लोकार्पण
Mumbai Trans Harbour Sealink
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

मुंबई | 11 जानेवारी 2024 : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ( एमटीएचएल ) अर्थात शिवडी न्हावा शेवा सागरी सेतू महामार्गाचे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. या सागरी सेतूवरून चार चाकी वाहनांना कावळ्याच्या वेगापेक्षाही अधिक वेगाने धावता येणार आहे. म्हणजे या चारचाकी वाहनांना ताशी 100 किलोमीटरच्या वेगाने जाता येणार आहे. तर मोटारबाईक, ऑटोरिक्शा आणि ट्रॅक्टर आदी वाहनांना या सागरी सेतूवरून जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कार, टॅक्सी, हलकी मोटर वाहने, मिनीबस आणइ दोन एक्सल बसेस आदी वाहने या सागरी सेतूवरून ताशी 100 किलोमीटरच्या वेगाने धावू शकणार आहेत. मात्र, या वाहनांना पुलावर चढण्याचा आणि उतरण्याचा वेग ताशी 40 किलोमीटर ठेवावा लागणार आहे. धोका, अथडळे आणि जनतेची असुविधा टाळण्यासाठी देशातील सर्वात लांब सागरी मार्गावरील पुलावर वेगाची मर्यादा लागू करण्यात आल्याचंही या अधिकाऱ्याने सांगितलं. थॅचर कूक नावाचा कावळा ताशी 97 किलोमीटर वेगाने धावतो. मात्र, आता या सागरी सेतूवरून या कावळ्याच्या वेगापेक्षाही अधिक वेगाने वाहनांना धावता येणार आहे.

या वाहनांना नो एन्ट्री

18,000 कोटी रुपये खर्च करून हा सागरी सेतू बांधण्यात आला आहे. हा सागरी सेतू मुंबईच्या शिवडीतून सुरू होऊन रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील न्हावा शेवा येथे संपणार आहे. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्टीएक्सल असलेली अवजड वाहने, ट्रक आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बसेस ईस्टर्न फ्रि वेवर जाऊ शकणार नाहीत. या वाहनांना मुंबई पोर्ट -शिवडी एक्झिट (एक्झिट 1 सी) चा वापर करावा लागणार आहे. आणि पुढे जाण्यासाठी गडी अड्डाच्या जवळ एमबीपीटी रोडवरून जावं लागेल. या सागरी सेतूवरून मोटारसायकल, मोपेड, तीन चाकी वाहने, ऑटो, ट्रॅक्टर, जनावरे वाहून नेणारी वाहने, धीम्या गतीने चालणारी वाहनांना एन्ट्री नसणार आहे.

अवघ्या 20 मिनिटात नवी मुंबईत

एमटीएचल एक हा सहापदरी सागरी सेतू आहे. याचा 16. 50 किलोमीटरचा भाग समुद्रावर आणि 5.5 किलोमीटरचा भाग जमिनीवर आहे. या सागरी सेतूमुळे अवघ्या 20 मिनिटात मुंबईतून नवी मुंबईत पोहोचता येणार आहे. दुसऱ्या मार्गाने मुंबईतून नवी मुंबईला गेल्यास दोन तास लागतात. पण या मार्गावरून गेल्यावर एक तास 20 मिनिटे वाचणार आहेत.

अवजड वाहनांना बंदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवडी-न्हावा शेवा सी-लिंकचं उद्घाटन उद्या होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोणतीही वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून महामार्ग पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे-मुंबई द्रुतगती आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर उद्या अवजड वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार पहाटे 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अवजड वाहतुकीस बंदी घालण्यात आलेली आहे. यातून अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वाहतूक मात्र वगळण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं महामार्ग पोलिसांनी अवजड वाहतुकदारांना उद्या दिवसभर वाहतूक टाळावी असं आवाहन केलेलं आहे

सेतूवर ‘एलईडी’ फुलपाखरे

सरकारच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या शिवडी-न्हावा शेवा सागरीसेतू महामार्गावरील विजेच्या खांबांवर ‘एलईडी’ फुलपाखरे लावण्यात येणार आहेत. येत्या सहा दिवसांत हे सुशोभीकरण करण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेवर सोपवण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यातील संभाव्य मार्गावर स्वच्छता राखण्याचे आणि शक्य तेथे सुशोभीकरण करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी संबंधित विभाग कार्यालयांना दिले आहेत.