मुंबई : ठाणे मनोरूग्णालयाची जागा नवीन रेल्वे स्थानकाला मिळण्याचा मार्ग एकदाचा मोकळा झाला आहे. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानक आणि मुलुंड स्थानकादरम्यान नविन रेल्वे स्थानक बांधले जाणार आहे. या नव्या स्थानकामुळे ठाणे स्थानकावर ( THANE ) होणाऱ्या जीवघेणी गर्दीतून प्रवाशांची लवकर सुटका होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ( MUMBAI HIGHCOURT ) हिरवा कंदील दिल्याने आता ठाणे मनोरूग्णालयाची जागा नवीन रेल्वे स्थानकासाठी मिळणार आहे.
ठाणे मनोरूग्णालयाच्या जागेवर नविन स्थानक बांधले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे मनोरूग्णालयाच्या जागेच्या हस्तांतरणावर लावलेला स्थगिती आदेश उठविला आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाकडून मध्य रेल्वला जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रस्थावित नव्या स्थानकामुळे प्रवाशांना नविन सुविधा मिळण्याबरोबरच ठाणे आणि मुलुंड या दोन्ही स्थानकांवरील प्रवाशांचा भार कमी होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
नव्या स्थानकासाठी 289 कोटीचा निधी
ठाणे महानगर पालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत या नव्या स्थानकासाठी 289 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ठाणे मनोरूग्णालयाच्या एकूण 72 एकर जागेपैकी 14 एकराहून अधिक जागा नव्या रेल्वे स्थानकासाठी मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या रेल्वे स्थानकासाठी 14.83 एकर जागा वापरली जाणार आहे. नविन रेल्वे स्थानकाच्या उभारणीनंतर ठाणे रेल्वे स्थानकाचे प्रवासी 31 टक्क्यांनी तर मुलुंड स्थानकातील प्रवासी 21 टक्क्यांनी घटणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. सध्या ठाणे स्थानकातून दररोज सुमारे 7.50 लाख प्रवासी येजा करीत असतात.
श्रेयवादाची लढाई
शिवसेनेच्या प्रतिनिधींनी रेल्वे बोर्डाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने नव्या रेल्वे स्थानकाची योजना मंजूर झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच ठाणे महापालिकेकडून या स्थानकाच्या विकासासाठी 289 कोटीही मंजूर झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. ठाणे स्थानकाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे खूप वर्षे प्रलंबित होता, आपण रेल्वे बोर्डाकडे हा विषय लावून धरल्याचे उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार राजन विचारे यांनी म्हटले आहे. या स्थानकाची मूळ कल्पना शिवसेना खासदार प्रकाश परांजपे यांची हाेती असे म्हटले जाते. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार संजीव नाईक यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर सध्याचे खासदार राजन विचारे यांच्या काळात यास मंजूरी मिळाली आहे.
.