मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन उद्या, १७ जुलैपासून सुरू होत आहे. त्यानिमित्त सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना चहापानाला आमंत्रित केले होते. पण, विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला. सत्ताधाऱ्यांनी चहापानानंतर पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्या राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाला चहापानाला बोलावलं होतं. पण, ते आले नाहीत. विरोधी पक्षाच्या वतीने पत्र देण्यात आलं आहे. विरोधी पक्षाला विषय माहिती नाही. पत्राऐवजी ग्रंथ लिहिला आहे. लक्षवेधी एकत्रित करून त्याचं पत्र दिलं आहे.
विधानसभा हे लोकशाहीचे प्रतीक आहे. त्यामुळे ज्या ज्या गोष्टी येतील त्या विषयांवर चर्चा करण्याची सत्तारुढ पक्षाची तयारी आहे. जास्तीत जास्त लोकहिताचा विचार करून न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करू. अजूनही विरोधी पक्ष मानसिकतेतून बाहेर निघाला नाही. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग यांचा निर्णय आला आहे. कायदेशीर सरकारला असंविधानिक म्हणायचं हे काम सुरू आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
आमचं सरकार आलं तेव्हा उद्योग पळवले जात असल्याचे आरोप झाले. या सरकारच्या वर्षभराच्या एफडीआयमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आलं. इंडिया टुडे गृपने सर्वेक्षण केलं. खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्य पहिल्या स्थान आहे. राज्यात २.३८ लाख कोटी रुपये गुंतवणूक आहे. कर्नाटक ८१ हजार कोटी, गुजरात ७४ हजार कोटी आणि उत्तर प्रदेश ४८ हजार कोटी रुपये गुंतवणूक आहे. कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेश या तिन्ही राज्यांचे आकडे एकत्र केले तरी महाराष्ट्राची गुंतवणूक ही जास्त आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारवर जनतेचा विश्वास आहे. उद्योग क्षेत्राचा विश्वास आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दुसरी महत्त्वाची गोष्टी म्हणजे शरद पवार यांनी पत्र लिहिलं. त्यात त्यांनी शिक्षणात महाराष्ट्राचा क्रमांक सातव्या स्थानावर गेल्याचा आरोप केला होता. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, दहा श्रेणी केल्या होत्या. पहिल्या पाच श्रेणीमध्ये कुठलंही राज्य ठेवण्यात आलं नाही. सहाव्या श्रेणीत चंदीगड आणि पंजाब आहे. सातव्या श्रेणीत महाराष्ट्र आहे. याचा अर्थ महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.