मुंबई : सेमी बुलेट ( SEMIBULLET ) ट्रेन म्हणून ओळखली जात असलेल्या आलिशान वंदेभारत ( VANDEBHARAT ) ट्रेनचे आता छोटे व्हर्जन येणार आहे. सध्या दरताशी 180 किमीच्या वेगाने धावण्याची क्षमता असलेली वंदेभारत ट्रेन सध्या एकामागोमाग देशातील नवनवीन शहरांमध्ये सुरू केली जात आहे. या ट्रेनचा वेग जास्त असल्याने दोन शहरांचा प्रवास वेगाने होणे त्यामुळे शक्य होणार आहे. या ट्रेन सध्या 16 डब्यांच्या आधारे चालविल्या जात आहेत. परंतू भविष्यात या ट्रेनचे डबे कमी करण्याची रेल्वे मंत्रालयाची योजना आहे.
पहिली वंदेभारत ट्रेन दिल्ली ते वाराणसी या मार्गावर साल 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली होती. त्यानंतर देशभरात आतापर्यंत आठ मार्गांवर वंदेभारत ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरसाठी वंदेभारत सुरू करण्याची घोषणा केली आहे. आता या वेगवान आणि आलिशान वंदेभारत ट्रेनचे व्यवस्थापन करणे रेल्वेला जड जात असल्याचे उघडकीस आले आहे.
राजधानी आणि शताब्दीपेक्षा महाग
वंदेभारत ट्रेन राजधानी आणि शताब्दी ट्रेन पेक्षाही महागडी आहे. वंदेभारतला फायद्यात आणण्यासाठी आर्थिक गणित जुळणे गरजेचे आहे. मोठ्या महानगरांना जोडणाऱ्या वंदेभारत ट्रेनला प्रवासी मिळताना अडचण होत आहे. कारण या ट्रेनचे तिकीट किमान 1600 ते 3000 इतके महाग आहे. त्यामुळे 2 – टीयर सिटी म्हणजेच एक लाख लोकसंख्येपर्यंतच्या शहरात या ट्रेनना आवश्यक प्रवासी मिळणे कठीण जाणार आहे. कारण या ट्रेनचे तिकीट महाग असल्याने सर्वसामान्यांच्या ते आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे सध्या 16 असलेले ट्रेनचे डबे घटवून ते 8 डब्यांपर्यंत करण्याची रेल्वेची योजना असल्याचे म्हटले जात आहे.
वंदेभारत जर छोट्या शहरांना जोडायची असेल तर तिच्या सोळा डब्यांसह ती चालविणे रेल्वेला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे 2 – टीयर शहरांना जोडणारी वंदेभारत आता सोळा ऐवजी आठ डब्यांच्या स्वरूपात चालविण्याची रेल्वेची योजना असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.
लवकरच स्लीपरकोच अवतार
देशभरात 400 वंदेभारत चालविण्याची रेल्वे मंत्रालयाची योजना आहे. वंदेभारतच्या सध्याच्या ट्रेन चेअरकार स्वरूपात धावत आहेत. या ट्रेनच्या डब्यात बैठी आसन व्यवस्था असल्याने या ट्रेन रात्रीच्या प्रवासासाठी योग्य नसल्याने आता लवकरच या ट्रेनचे शयनआसनी स्लीपरकोच अवतार लवकरच रेल्वेच्या कोच फॅक्टरीत तयार केला जात आहे. वंदेभारत हा ट्रेन सेट असून त्याच्या दर दोन डब्यांनंतर मोटर बसवलेली आहे. त्यामुळे वंदेभारतला लांबपल्ल्यांच्या मेल -एक्सप्रेसप्रमाणे पुढे इंजिन जोडण्याची आवश्यकता नाही, ती मेट्रो किंवा लोकल प्रमाणे चालते.