मुंबई : आज मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होतोय. यात अब्दुल सत्तार शपथ घेणार आहेत. त्यांच्या नावाची खुर्ची राजभवनातील हॉलमध्ये लावण्यात आली आहे. टीईटी घोटाळ्यात नाव आल्यानंतरही सत्तारांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. बंडखोरीच्या 10 दिवसांच्या हायहोल्टेज ड्राम्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 30 जूनला गोपनियतेची शपथ घेतली अन् राज्यात नवं सरकार आलं. या काळात महाराष्ट्राने वेगळं राजकारण पाहिलं. दरम्यानच्या काळात बऱ्याच घडामोडी घडल्या. एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणाऱ्या नेत्यांची संख्या दिवसागणिक वाढत गेली. मग शिंदेंनी आम्हीच खरी शिवसेना म्हणत शिवसेनेची ओळख असलेल्या धनुष्यबाण या चिन्हावरही दावा केला. या सगळ्या घडामोडींदरम्यान मंत्रिमंडळ विस्तार रखडला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच बैठका व्हायच्या. या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मात्र 39 दिवस रखडला होता. पण आता आज या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात सत्तारांना स्थान मिळालं आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी घोटाळ्यात जे विद्यार्थी सहभागी होते, त्यांची एक यादी परीक्षा परिषदेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावं आहेत. हीनाकौसर अब्दुल सत्तार आणि उजमा अब्दुल सत्तार यांची नावं या यादीत आहेत. त्यावरून आता त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. अश्यात त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
आज मंत्रिमंडळाचा पहिल्या टप्प्यातील विस्तार होतोय. यात विधान परिषद सदस्यांचा समावेश असणार नाही. विधान परिषद सदस्यांना विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात भाजपकडून संधी दिली जाणार नसल्याची माहिती आहे. तर शिंदे गटाकडे एकही विधान परिषदेचा अधिकृत आमदार नाही! सामान्य प्रशासन, नगर विकास, उद्योग, कृषी ही खाती शिंदे गटाकडे राहणार असल्याची चर्चा आहे. तर गृह, वित्त, महसूल, सार्वजनिक बांधकाम ही खाती भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. गृह आणि वित्त ही खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहतील, अशी चर्चा आहे. फडणवीसांचा गृहविभागात दबदबा आहे. अश्यात गृहखातं त्यांच्याकडेच राहणार असल्याचं जवळजवळ फिक्स आहे.