विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार मोर्चे बांधणी करत आहेत. ते महाराष्ट्रभरात दौरा करत आहेत. ठिकठिकाणी ते स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांनी रणनिती आखल्याचं दिसत आहे. महायुतीतील नेते त्यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत. अशातच शरद पवार यांच्यापासून एक पक्ष दुरावणार असल्याचं बोललं जात आहे. राजकीय वर्तुळात याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. महाविकास आघाडीतील एक पक्ष शरद पवारांपासून दुरावणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागल्या आहेत. यावर आता जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केलं आहे.
समाजवादी पक्ष शरद पवार यांच्यापासून दुरावणार असल्याच्या चर्चा होत आहे. विधानसभा निवडणुकीआधी समाजवादी पक्ष शरद पवारांपासून दुरावू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यावर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या चर्चा निरर्थक असल्यांचं आझमी म्हणाले आहेत.
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी राजकीय वर्तुळातील चर्चांबाबत एक ट्विट केलं आहे. त्यांनी या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. आम्ही राष्ट्रवादीसोबत आहोत, याच कोणतीही शंका नाही. समाजवादी पार्टी कायम महाविकास आघाडीचं नेतृत्व करत असलेले आदरणीय शरद पवार यांच्यासोबत राहिली आहे. यापुढेही समाजवादी पार्टी शरद पवारांसोबतच राहणार आहे. आता महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीला जनादेश द्यायला निघाली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र!, असं ट्विट अबू आझमी यांनी केलं आहे.
राष्ट्र्वादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही याबाबत ट्विट केलं आहे. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी दुरावणार असल्याच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला आहे. काही खोडकर लोक राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाबाबत चुकीच्या बातम्या पसरवत आहेत. पण त्यात काहीही तथ्य नाही. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी कायम सोबत होते. पुढेही आम्ही सोबत राहू. मी हे स्पष्ट करतो की हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडीतूनच निवडणूक लढवतील, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.