मुंबई : हार्बर मार्गावरील (Harbour line) एसी लोकल (AC Local) गाड्यांना प्रवासी वर्ग न मिळाल्याने बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. हार्बर मार्गावरील एसी लोकल आता मध्य पश्चिम मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तिकीट दर (Ticket price) कमी केल्यानंतर एसी प्रवासांची संख्या वाढेल असं रेल्वे प्रशासनाला वाटलं होतं. परंतु प्रवासी संख्या वाढत नसल्याने एसी लोकल बंद करण्यात येणार आहे. 1 मे ते 8 मे दरम्यान, मध्य रेल्वेवर दररोज 28,141 प्रवाशांनी एसी लोकल ट्रेनमधून प्रवास केला. एकूण 24,842 प्रवाशांनी मध्य रेल्वेने तर 3,299 प्रवाशांनी हार्बर रेल्वेने प्रवास केला आहे. हार्बरवरील प्रवाशांना त्यांनी काढलेले पासचे भाडे रिफंड देखील करण्यात येणार आहे. 7 दिवसाच्या कालावधीमध्ये या हालचाली सुरू होणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
कमी प्रवाशांमुळे बंद करण्याचा निर्णय
एप्रिलमध्ये दररोज सरासरी 19,761 प्रवाशांनी प्रवास केला. 19,761 पैकी 17,473 प्रवाशांनी मध्य रेल्वेने प्रवास केला आणि 2,288 प्रवाशांनी हार्बर रेल्वेवरून प्रवास केला आहे. “हार्बर रेल्वे मार्गावर एसी लोकल गाड्यांच्या कमी प्रवाशांमुळे, एक ट्रेन करण्यात येणार आहे. ती लोकल मेनलाइनवर सुरू केली जाईल,” असे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.
एसी ट्रेनची संख्या वाढवण्याबाबत चर्चा
पश्चिम मार्गावर नवीन एसी सेवा सुरू केल्या जातील. कारण विभागीय रेल्वेला नवीन एसी लोकल गाड्या मिळणार आहेत. आमच्याकडे तीन एसी गाड्या कार्यरत आहेत, एक ट्रेन पीरियडिक ओव्हर हॉल (POH) साठी आहे. तसेच एसी ट्रेनची संख्या वाढवण्याबाबत चर्चा सुरू आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले.