मुंबई, कोरोनामुळे (Corona) गेल्या दोन वर्षांपासून थंडावलेली प्लॅस्टिक (Plastic) पिशव्यांविरोधातील कारवाई आता पुन्हा वेगाने सुरू होणार असून 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांची (Plastic Bag) विक्री करणारे व उत्पादन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. 1 जुलैपासून वॉर्डनिहाय पथके कारवाई करणार आहेत, अशी माहिती उपायुक्त संजोग कबरे यांनी दिली.मुंबई महापालिकेने आरोग्याला घातक तसेच पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे सखल भागात पाणी साचण्याला कारणीभूत ठरणाऱ्या 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घातली. मुंबईत 26 जुलै 2005 मध्ये आलेल्या महापुराला याच पिशव्या कारणीभूत ठरल्या होत्या. त्यानंतर 2018मध्ये 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या विक्री, वापर करणारे व उत्पादन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला. मुंबई महापालिका प्रशासनाने आतापर्यंत कारवाईचा बडगा उगारत 86 हजार किलो प्लॅस्टिक जप्त केले तर 4 कोटी 65 लाखांचा दंड वसूल केला होता. त्यानंतर 2020 मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि मुंबई महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी कोरोनाविरोधात सहभागी होते. मात्र आता कोरोना नियंत्रणात असून प्लॅस्टिकविरोधातील मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे.
साठेदार, पुरवठादार, विक्रेते यांनी नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियम 2006 च्या कलम 9 अन्वये प्रथम गुन्ह्यासाठी 5 हजार रुपये, दुसऱ्या गुन्ह्यासाठी 10 हजार रुपये आणि त्यानंतरच्या गुन्ह्यांसाठी 3 महिन्यांपर्यंत तुरुंगवास व 25 हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात येणार आहे.
50 मायक्रॉन प्लॅस्टिकपासून बनवल्या जाणाऱ्या पिशव्या (हँडल असलेल्या व नसलेल्या); प्लॅस्टिकपासून बनवण्यात येणाऱ्या व एकदाच वापरून टाकून दिल्या जाणाऱ्या (डिस्पोजेबल) वस्तू जसे की ताट, कप्स, प्लेट्स, ग्लास, चमचे इत्यादी; हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणान्या प्लॅस्टिकच्या वस्तू, द्रव्य पदार्थ साठवण्यासाठी वापरात येणारे कप/ पाऊच, सर्व प्रकारचे अन्नपदार्थ, धान्य इत्यादी साठवण्यासाठी व पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लॅस्टिक आणि प्लॅस्टिक वेष्टन यांचा समावेश होतो.