मुंबईः दिशा सालियानच्या मृत्यूवरुन भाजप आमदार आता आक्रमक झाले आहेत. ज्यानंतर गृहमंत्री फडणवीस यांनीही दिशाचा मृत्यू नेमका कसा झाला, याच्या चौकशीसाठी एसआयटी नेमण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर सभागृहात आरोप-प्रत्यारोपांचा खेळ रंगला आहे.
हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस दिशा सालियानच्या मुद्द्यानं प्रचंड गाजला. आज 11 च्या दरम्यानं नितेश राणे यांनी दिशा सालियन प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. नितेश राणे यांनी अशी मागणी केल्यानंतर सभागृहात गोंधळ उडाला. त्यानंतरकाही काळ सभागृह तहकूब करण्यात आले.
सव्वा बाराच्या दरम्यान अधिवेशन सुरुही झालं. त्यानंतर पुन्हा नितेश राणे यांनी दिशा सालियन मुद्दा उपस्थित केला. हा विषयावर सभागृह दुसऱ्यांदा तहकूब करण्यात आले.
साडे बाराच्या दरम्यान पुन्हा अधिवेशन भरले आणि पुन्हा तिच मागणी करण्यात आली. तर दुपारी एकच्या दरम्यान पुन्हा कामकाज सुरु करण्यात आले तेव्हा मात्र भाजपच्या महिला आमदारांनी दिशा सालियानच्या चौकशीची मागणी केली.
तेव्हा सभागृह चौथ्यांदा तहकूब करण्यात आले. तर सव्वा एकच्या दरम्यान कामकाज सुरु झाल्यानंतर भाजपच्या अमित साटम यांनी पुन्हा दिशा सालियन प्रकरणी आक्रमक झाले आणि सभागृह पाचव्यांदा तहकूब करण्यात आले.
दिशा सालियान प्रकरणात एका मंत्र्यांचा हात आहे., म्हणत सत्ताधारी आमदार सभागृहात घोषणा देत होते, आणि दुसरीकडे सभागृहाबाहेर भाजप नेते एसआयटीच्या चौकशीचीही मागणी करत होते.
वारंवार सभागृह तहकूब झाल्यामुळे गृहमंत्री फडणवीस यांनी दिशा सालियान प्रकरणात एसआयटी चौकशी करण्याचे मान्य केले. आणि त्यावर चौकशीच करायची असेल तर मग पूजा चव्हाण प्रकरणातही एसआयटी नेमण्याची मागणी अजित पवार यांनी केली.
अजित पवारांच्या या मागणीवर चित्रा वाघ यांनी बोलण्यास नकार दिला., मात्र भाजप आमदार श्वेता महालेंनी पूजा प्रकरणात एसआयटी चौकशी व्हावी असं त्यांनी स्पष्ट सांगितले.
विधानपरिषदेत हा राडा झाल्यानंतर तिकडे विधानपरिषदेत विरोधक आक्रमक झाले. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंवर एका महिलेनं केलेल्या गंभीर आरोपांबाबत एसआयटीची मागणीही करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी एका महिलेसोबत शेवाळेंचे व्हिडीओ व्हायरल झाले होते, त्या महिलेनं अत्याचाराचे आरोप केले. आहेत त्यामुळे जसं विधानसभेत दिशा सालियानच्या मृ्त्यूबद्दल एसआयटी नेमली गेली. तसं विधानपरिषेदत शेवाळेंवरच्या आरोपांबद्दल एसआयटी नेमण्याचे निर्देश सभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.
दिशा सालियान नेमकी कोण होती आणि सत्ताधारी त्यावरुन आक्रमक का आहेत. तर दिशा सालियान अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर होती. सुशांतसिह राजपूत वांद्रेत तर दिशा सालियान मालाडमध्ये राहत होती. 8 जून 2020 रोजी दिशा सालियानचा इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला होता.
त्याच्या बरोबर 6 दिवसांनी म्हणजे 14 जून 2020 रोजी सुशांतसिंह राजपूतचाही मृत्यू झाला. या दोन्ही मृत्यूंमध्ये काहीतरी कनेक्शन असल्याचा संशय सत्ताधाऱ्यांचा आहे. दिशा सालियानची बलात्कारानंतर हत्या झाल्याचा दावा राणेंनी अनेकदा केला आहे. यामध्ये त्यांनी थेटपणे आदित्य ठाकरेंचंही नाव घेतलं आहे.
मात्र गेल्या सरकारच्या चौकशीवेळी मुंबई पोलिसांनी दिशा सालियानच्या मृत्यूला आत्महत्या ठरवलं त्यामुळे दिशा सालियानच्या मृत्यूच्या चौकशीसाठी शिंदे-भाजप सरकारनं आता एसआयटी नेमली आहे.
दरम्यान गेल्या नोव्हेंबरमध्ये सीबीआयनं दिशा सालियानच्या मृत्यूला अपघात ठरवल्याच्या बातम्या आल्या होत्या. तोच मुद्दा अजित पवार यांनी मांडल्यानंतर सीबीआयकडे अद्याप हे प्रकरण गेलं नसल्याचं फडणवीस यांनी सांगितले.
मात्र सीबीआयच्या त्या कथित रिपोर्टआधी विरोधात असताना नितेश राणेंनी दिशा सालियानच्या हत्येचे पुरावे असल्याचं म्हटलं होतं. सभागृहात एक पेनड्राईव्हही दाखवला होता, मात्र नंतर मुंबई पोलिसांनी पुरावे मिटवले असल्याची शंकाही राणेंनी वर्तवली होती.
दरम्यान सीबीआयनं अद्याप दिशा सालियानच्या मृत्यूची चौकशीच केली नसल्याचं गृहमंत्री फडणवीसांनी म्हटलं आहे. मात्र ज्या ‘AU’ या दोन शब्दांनी हा वाद सुरु झाला. अभिनेता सुशांतसिंगला रिया चक्रवर्तीनं ड्रग्स दिल्याचा आरोप भाजप नेत्यांचा आहे.
त्यासोबत रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरे यांचाही परस्परसंबंध असल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. अनेकवेळा रिया आणि आदित्य ठाकरेंमध्ये फोनवरुन संभाषण झाल्याचा आरोपही होतोय. रियाच्या फोनमधील AU हे आदित्य उद्धव यांचं नाव आहे का., अशी शंका राहुल शेवाळेंनी उपस्थित केली आहे. मात्र ते AU म्हणजे मैत्रीण अनन्या उदास असल्याचं याआधीच रिया चक्रवर्तीनं म्हटलंय.