मुंबई : राज्यात सध्या दोन अयोध्या दौरे (Ayodhya Visit) चांगलेच गाजत आहे. एक म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा (Raj Thackeray) अयोध्या दौरा तर दुसरा दौरा त्यांचे पुतणे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंचा (Aditya Thackeray). या दोन्ही दौऱ्यावरून मनसे आणि शिवसेनेत राजकीय घमासान सुरू आहे. राज ठाकरेंचा अयोध्या दौरा घोषित होताच शिवसेनेकडूनही आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची हाक देण्यात आली. या दौऱ्याच तारीखही ठरली. येत्या 10 जूनला आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा करणार असल्याचे सांगण्या आले. मात्र हा दौरा आता पुढे ढकलाला जाण्याची शक्यता आहे. मात्र या दौऱ्याला नेमकं आडवं काय आलं आहे? हा दौरा का पुढे ढकला जातोय? असे अनेक सवाल राजकीय वर्तुळात विचारण्यात येत आहेत. मात्र याचे कारणही समोर आले आहे.
10 जूनला आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा आहे, असे शिवसेना नेत्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. या दौऱ्यासाठी अयोध्येत पोस्टरही लागले आहेत. मात्र राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. 10 जूनला महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीसाठीचे मतदान आहे. यात आमदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात बदल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर पुढच्या काही दिवसांत आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा होऊ शकतो, अशी शक्यता आता वर्तवली जात आहे. त्यामुळे या दौऱ्याचं नेमकं काय होणार ते शिवसेना लवकरच सांगेल.
मात्र या दौऱ्यावरून आणि राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून टीका होत असातना आता भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेवर पलटवार केला आहे.आदित्य ठाकरेंचं अयोध्येला जाणं म्हणजे हिंदूत्व सिद्ध होत नाही. आता एकजण हिंदूत्व सिद्ध करण्यासाठी जातोय हे नाटक आहे. असा घणाघात त्यांनी केला आहे. तर दुसऱ्या बाजुला दुटप्पी भूमिका घेत आहेत. हनुमान चालीसा म्हणणाऱ्या नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर देशद्रोह लावताय. आणी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणारांना केवळ गाडायची भाषा करायची. हे योग्य नाही. त्यामुळे शिवसेनेने सत्ता टिकवण्यासाठी हिंदूत्व गुंडाळून ठेवलंय, हे सिद्ध झालंय. असे म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केलीय. त्यामुळे सध्या तरी दोन अयोध्या दौरे चांगलेच चर्चेत आहेत.