मुंबई: राज्यात सत्तांतर झाल्यापासून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. दुसरीकडे, शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेचे दोन्ही पक्ष धनुष्यबाण या चिन्हावर दावा दाखल करत आहेत. हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ठ आहे. अशात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात फूट दिसून आली आहे. माजी नगरसेवक संतोष खरात यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. यानंतर आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधला आहे. इतकंच काय तर हिम्मत असेल माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवा असं थेट आव्हान देखील दिलं आहे.
आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की, “घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो की, माझ्या विरोधात निवडणुकीला उभं राहा. जर त्यांनी सांगितलं तर मी माझ्या मतदारसंघातून राजीनामा देईल. त्यांनी राजीनामा द्यावा आणि माझ्याविरोधात वरळीतून निवडणुकीला उभं राहा.”
#WATCH | I've challenged this unconstitutional CM (Eknath Shinde) to contest the Assembly elections against me. I will resign from my seat & he should resign from his seat, and let him contest from Worli against me: Shiv Sena leader Aaditya Thackeray #Maharashtra pic.twitter.com/pp0X39H7QE
— ANI (@ANI) February 4, 2023
“ते आपल्या स्वार्थासाठी मुंबई आणि महाराष्ट्राचा वापर करत आहेत. यामुळेच मी रस्ते घोटाळ्याचा प्रश्न उपस्थित केला. मला असं वाटतं की मुंबईत हुकूमशाही सुरु आहे. एक वर्ष उलटून गेलं तरी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाहीत. त्यांनी एक प्रशासक नियुक्त केला असून मुख्यमंत्री त्यांना आदेश देतात. आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत आणि निवडणूकही जिंकू.”, असंही आदित्य ठाकरे यांनी पुढे सांगितलं.
शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर धनुष्यबाण चिन्हावर दोन्ही गटांनी दावा दाखल केला आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्याकडून शिवसेना पक्षासह चिन्हाची मागणी केली जात आहे. सुप्रीम कोर्टासह निवडणूक आयोगात दोन्ही गटाकडून म्हणणं मांडले जात आहे. निवडणूक आयोगाकडे दोन्ही गटाच्या वकिलांनी आत्तापर्यंत केलेला युक्तिवाद बघता यामध्ये पक्षाचे नाव आणि चिन्हा गोठवलं गेलं आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार याबाबत संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून आहे. सुप्रीम कोर्टात सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अद्याप झालेला नाही, त्यामुळे शिवसेना पक्ष कुणाचा आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाला याबाबतचा निर्णय देतांना निवडणूक आयोगाची मोठी कसोटी लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या समोर शिंदे गट आणि ठाकरे गट यांनी केलेला युक्तिवाद बघता धनुष्यबाण चिन्ह कुणाला याबाबत स्पष्टता येत नाही. निवडणूक आयोगाकडून आत्तापर्यन्त तारीख पे तारीख सुरू आहे.