मुंबई : वानखेडे किंवा ब्रेबॉर्न या मुंबईतील क्रिकेट स्टेडियमवर ‘कोविड’ सेंटर उभारण्याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेली मागणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी फेटाळून लावली. पावसाळ्यात मैदानांवर चिखल साचण्याची शक्यता असल्याचं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं. (Aditya Thackeray clarifies on Sanjay Raut demand for Wankhede Stadium as COVID Centre)
“कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मुंबईत सर्व संसाधनांचा वापर करायला हवा. क्वारंटाईन सुविधा देण्यासाठी वानखेडे स्टेडियम ताब्यात घेण्याचा निर्णय चांगला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती आहे, वानखेडेसह ब्रेबॉर्न स्टेडियमही का ताब्यात घेत नाही?” असा सवाल संजय राऊत यांनी ट्विटरवरुन केला होता.
“संजयजी, आपण स्टेडियम किंवा क्रीडांगणांची मैदाने घेऊ शकत नाही, कारण तिथे चिखल होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात ती वापरण्यास योग्य होणार नाहीत. भरीव/काँक्रीट बेससह मोकळी जागा वापरण्यायोग्य आहे आणि तिथे आधीच (क्वारंटाईन सुविधा) केली जात आहे.” असं उत्तर आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन दिलं.
Sanjay ji, we can’t take the grounds of the stadiums or playgrounds because they have a mud base and they won’t be usable during monsoons. An open space with a solid/ concrete base is usable and it’s being done already.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 17, 2020
त्यानंतर संजय राऊत यांनी पुन्हा ट्वीट करत आदित्य ठाकरे यांची भूमिका योग्यच असल्याचं सांगितलं.
वानखेडे तसेच ब्रेबाॅन सारख्या क्रिकेट मैदानावर करोना रूग्णांसाठी इस्पितळे उभारली जाणार नाहीत ही @AUThackeray यांची भुमिका योग्यच आहे. वानखेडे करोना रूग्णांसाठी घेणार असे वृत्त प्रसिद्ध झाले होते.वानखेडे वापरात आहे. ब्रेबाॅन रिकामे आहे इतकेच. मैदाने वाचवायलाच हवीत..@PawarSpeaks
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 17, 2020
महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनीही पावसाळ्यात चिखल होण्याच्या शक्यतेने स्टेडियम ‘कोविड’ सेंटर म्हणून वापरण्यास योग्य नसल्याचं सांगितलं होतं. वानखेडे स्टेडियमबाबत केवळ चाचपणी करण्यात आली, ते ताब्यात घेणे हा अंतिम पर्याय असल्याचं चहल यांनी स्पष्ट केलं होतं.
मरीन ड्राईव्ह सिटीझन असोसिएशननेही वानखेडेवर क्वारंटाईन सेंटर उभारण्यास विरोध केला होता. पावसाळ्यात या मैदानावर चिखल होऊन रोगराई पसरु शकते, अशी भीती असोसिएशनने व्यक्त केली होती. केंद्राच्या गाईडलाईननुसार रहिवासी विभागात क्वारंटाइन सेंटर उभारण्यास मनाई असल्याच्या मुद्द्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं होतं. (Aditya Thackeray clarifies on Sanjay Raut demand for Wankhede Stadium as COVID Centre)