मुंबई : एकीकडे वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी वृक्षतोडीवरुन राजकारण होत असताना मुंबईत 24 ठिकाणी मियावाकी वनं बहरली आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी चेंबुरमधील भक्ती पार्क परिसरात मियावाकी बागेची पाहणी केली. (Aditya Thackeray visits Japanese Miyawaki Garden in Chembur Mumbai)
गेल्या वर्षभरात 24 ठिकाणी मियावाकी वनांच्या माध्यमातून तब्बल एक लाख 62 हजार 398 झाडे मुंबईला प्राणवायू देण्यास सज्ज झाली आहेत. मुंबईतील भक्ती पार्क येथील पालिकेच्या उद्यानात मियावाकी वन उभारलं आहे.
मियावाकी झाडं लावायची कशी, जोपासायची कशी?
त्सुनामीनंतर ओसाड होणाऱ्या जमिनीवर जपानी पद्धतीने झाडं जगवली गेली, तीच पद्धत मुंबईत वापरली गेली आहे. 93 वर्षीय शास्त्रज्ञ आकिरा मियावाकी यांच्या नावाने ही पद्धत ओळखली जाते.
मियावाकी पद्धतीत वनस्पतींच्या मूळ प्रजाती एकमेकांच्या अगदी जवळ लावल्या जातात, जेणेकरुन हरितकणांना फक्त वरुन सूर्यप्रकाश मिळतो आणि झाडांची आडव्या नव्हे, वरच्या दिशेने वाढ होते. परिणामी, वृक्ष अंदाजे 30 पट अधिक सघन होतात, 10 पट वेगाने वाढतात आणि 3 वर्षांच्या कालावधीनंतर देखभाल-मुक्त होतात.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
गेल्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ झाला. एका वर्षात ही झाडं चांगली बहरली आहेत. याची पाहणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.
मुंबईत 3 लाख झाडांचं टार्गेट
“मुंबईत जी वेगवेगळी विकास कामं होत आहेत, मानखुर्दच्या फ्लायओव्हरचं काम काही दिवस थांबलं, पण 15 जूनच्या आधी काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. आज भक्ती पार्कमध्ये 56 हजार झाडं झाली आहेत. पुढच्या दोन महिन्यात अजून 15 हजार झाडं लावणार आहोत” असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. ‘जिथे काँक्रिटचं जंगल आहे, तिथे झाडं लावणं गरजेचं आहे. मुंबईतलं आमचं टार्गेट 3 लाख झाडांचं आहे, अशी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली. (Aditya Thackeray visits Japanese Miyawaki Garden in Chembur Mumbai)
केंद्र सरकार चर्चा का करत नाही?
“कोणीही कितीही ट्वीट केलं, तरी केंद्र सरकार का बोलत नाही? आधी मला वाटलं की चायना बॉर्डर आहे, पण नंतर समजलं की ते तसं नाही,
मग केंद्र सरकार का चर्चा करत नाही?” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला.
मनसे म्हणजे टाईमपास
मनसे पक्ष आहे की काय आहे, हे माहित नाही. त्यांच्याकडे स्वतःचे कार्यकर्ते पण नाहीत, टाईमपास आहे तो, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
इंधन दरवाढ आणि शेतकरी यावर आम्ही बोलत असतो. नौटंकी बंद करा, हे केंद्र सरकारला सांगावं आणि त्यांच्या मित्रांना सांगावं, केंद्र सरकारने थेट शेतकऱ्यांशी बोलावं, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
(Aditya Thackeray visits Japanese Miyawaki Garden in Chembur Mumbai)