मुंबई : उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील घटनेने संपूर्ण देश ढवळून निघत असताना, नालासोपाऱ्यातही पोलिसांच्या असभ्य वर्तणुकीमुळे 19 वर्षीय तरुणीचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. (adult lady suicides after Nalasopara police misbehaved with her)
लग्नाचं अमिष दाखवून पीडित तरुणीवर अत्याचार करण्यात आला होता. यावरून तुलिंज पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र यादरम्यान पीडित तरुणीचा तापासाधिकारी पोलीस आणि परिसरातील काही तरुणांकडून मानसिक छळ करण्यात आला. त्यामुळे तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा आरोप पीडित तरुणीच्या आई वडिलांनी केला आहे. सध्या तरी तुलिंज पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून घटनेचा तपास सुरू केला आहे.
या पीडित तरुणीचे सुनील माने या तरुणाशी ऑगस्ट महिन्यात प्रेमसंबंध जुळले होते. या प्रेम संबंधातून दोघे लग्न करणार होते. पण प्रियकराने पीडितेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. त्यानंतर तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पीडित तरुणीने 15 सप्टेंबर 2020 रोजी आपल्या आईसोबत तुलिंज पोलीस ठाण्यात जाऊन प्रियकर सुनील माने याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी अटक केली असून सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. परंतु बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास अधिकारी API दिपक गिरकर यांनी पीडित तरुणीसोबत असभ्य वर्तन केले. महिला पोलिसांनी पीडितेचा जबाब न घेता एका पुरुष पोलिसाने जबाब घेतला. तिला अपमानास्पद वागणूक दिली. या सर्व प्रकाराला कंटाळून मुलीने रात्री 8 च्या दरम्यान राहत्या घरात आत्महत्या केली असल्याचा आरोप पीडित तरुणीच्या आई वडिलांनी केला आहे.
मुलीच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, असा पवित्रा पीडितेच्या आईने घेतला आहे.
दोषींवर कारवाई करु : अप्पर पोलीस अधीक्षक
लग्नाचे अमिष दाखवून जबरदस्तीने बलात्कार केल्याप्रकरणी पीडित तरुणीच्या जबाबावरून तुलिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीसुद्धा न्यायालयीन कोठडीत आहे. आम्ही आमची कारवाई केली आहे. पीडित तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या सर्व घटनेचा तपास सुरू असून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करु, असे वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत मगर यांनी सांगितले.
संबंधित बातम्या
Mumbai Suicide | सासरच्या जाचामुळे वडाळ्यात महिलेची आत्महत्या, मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशीच गळफास
Nagpur Suicide | नागपुरात 56 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या, नेमकं कारण काय?
(adult lady suicides after Nalasopara police misbehaved with her)