मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार आंदोलन केलं. यावेळी पवार यांच्या निवासस्थानी चपला फेकण्यात आल्या, तसंच दगडफेकही करण्यात आली. या आंदोलनामागे अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येतोय. अशावेळी शुक्रवारी रात्री मुंबई पोलिसांनी सदावर्ते यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आणि आज किला कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टात सुनावणी पार पडल्यानंतर सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आलीय. तर अन्य आरोपींची न्यायलयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यान, आज किला कोर्टात नेमकं काय घडलं? दोन्ही बाजूच्या वकिलांनी कोर्टात काय युक्तीवाद केला आपण जाणून घेऊया.
सदावर्ते यांना शुक्रवादी अटक करण्यात आल्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी दोन्ही पक्षांनी आपली बाजू मांडली. सरकारी पक्षाकडून सदावर्ते यांची 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. तर सदावर्ते यांचे वकील महेश वासवानी यांनी सदावर्ते याचा जामीन कोर्टात सादर केला. दरम्यान, सदावर्ते यांच्या जामीन अर्जाला सरकारी वकिलांनी तीव्र विरोध केला. गुणरत्न सदावर्ते यांच्या बाजूने महेश वासवानी, घनश्याम उपाध्याय आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी कोर्टात युक्तीवाद केला. तर प्रदीप घरत यांनी सरकारची बाजू मांडली.
वकील गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी दिली जावी, त्यांच्यावर लावलेली कलमं गंभीर आहेत, असं सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले. तर सदावर्ते यांना ताब्यात घेताना कुठलीही नोटीस देण्यात आलेली नसल्याचं वकील महेश वासवानी म्हणाले.
सदावर्ते यांच्या विरोधातील एफआयआरमध्ये अनेक गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. सदावर्ते यांनी 7 एप्रिल रोजी चिथावणीखोर भाषण केलं होतं. त्यात त्यांनी शरद पवार यांना टार्गेट केलं होतं. 12 तारखेला आम्ही बारामतीत येऊ, घरी राहून दाखवा, असं आव्हानच सदावर्ते यांनी पवारांना दिलं होतं. सदावर्ते यांनी आझाद मैदानात आधी जल्लोष करून नंतर कर्मचाऱ्यांची माथी भडकवल्याचा आरोप या एफआयआरमध्ये नोंदवला आहे. तसेच सरकारी कामात अडथळा आणणे आणि परवानगी शिवाय इतरांच्या घराच्या परिसरात घुसखोरी करण्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. या शिवाय आंदोलनाच्या दिवशी काही आंदोलकांनी मद्यप्राशन केलं होतं, असंही एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
इतर बातम्या :