‘विदर्भ आणि मराठवाडा स्वतंत्र राज्य झाली पाहिजेत’, गुणरत्न सदावर्ते यांची अजब मागणी

| Updated on: Nov 24, 2022 | 8:24 PM

मराठा आरक्षणाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणारे आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यांसाठी कोर्टात लढाई लढणारे वकील गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

विदर्भ आणि मराठवाडा स्वतंत्र राज्य झाली पाहिजेत, गुणरत्न सदावर्ते यांची अजब मागणी
Follow us on

मुंबई : मराठा आरक्षणाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणारे आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यांसाठी कोर्टात लढाई लढणारे वकील गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठवाडा आणि विदर्भ अशी दोन स्वतंत्र राज्य झाली पाहिजेत, अशी मागणी केलीय. त्यांच्या या मागणीमुळे आगामी काळात महाराष्ट्रात काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी त्यांनी उद्या सोलापूरमध्ये संवाद परिषद बोलावली आहे. याबाबतची माहिती स्वत: गुणरत्न सदावर्ते यांनी दिलीय.

“मराठवाडा आणि विदर्भ हे छोटी राज्य म्हणण्यापेक्षा स्वतंत्र राज्य निर्माण झाली पाहिजेत. त्यांचा कारभार स्वतंत्रपणे चालला पाहिजे. त्या भागातील मागासलेपण संपवण्याकरता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून नवीन राज्य निर्मितीच्या रचनेतून मराठवाडा आणि विदर्भ स्वतंत्र राज्य झालं पाहिजे”, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली.

“उद्या धाराशिवमध्ये एक मोठी संवाद परिषद मराठवाड्यातील कष्टकऱ्यांचा आवाज सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी आयोजित केलेली आहे”, असं गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

“धर्म म्हणून तिकडे कोणी एकत्रित येणार नाही. सगळ्या जाती-धर्माचे विद्यार्थी, वकील, शिक्षक, महिला हे सगळे मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी एकत्र येणार आहेत”, असं सदावर्ते म्हणाले.

“आम्ही राजकारण म्हणूनही मागणी करत नसून काहीतरी वेगळं उभं करावं यासाठी ही मागणी करत आहोत”, असं ते म्हणाले.

“काही लोक चुकीच्या चर्चा करतात. त्या चर्चांवरती कशाप्रकारे पूर्णविराम देण्यात येईल आणि मराठवाड्याची स्वतंत्र राज्याची मागणी कशी योग्य आहे? हे दिशा ठरवण्यासाठी उद्याची परीक्षा आहे”, असं देखील ते म्हणाले.

“आम्ही आव्हान करणार आहोत, मग ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असतील, तुमची भूमिका जाहीर करा. तुम्ही स्वतंत्र विदर्भाच्या आणि स्वतंत्र मराठवाड्याच्या संदर्भात तुमची भूमिका जाहीर करा”, असं आवाहन त्यांनी केलं.

“महाराष्ट्रातील सरकार असेल केंद्रातलं सरकार असेल, ज्याप्रमाणे तेलंगणाला स्वतंत्र राज्य आहे, ज्याप्रमाणे छत्तीसगड स्वतंत्र राज्य झालं, त्याच धर्तीवर विदर्भ आणि मराठवाडा सुद्धा स्वतंत्र राज्य व्हावं म्हणून आम्ही पुढे येणार आहोत”, अशी माहिती त्यांनी दिली.

“जे कोणी आम्हाला लपून-छपून विरोधी भूमिका किंवा नको असणारी सेशन आम्हाला लावू पाहत आहेत त्यांना उद्या समजेल कोण-कोण आमच्यासोबत आहेत आणि किती आमच्यामध्ये बळ आहे”, असं चॅलेंज त्यांनी दिलं.