ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारासाठी आम्ही बंडखोरी केली असल्याचे सातत्याने सांगितले जाते. त्यामुळे आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी मात्र आता जे पक्ष आनंद दिघे यांच्या नावावर राजकारण करतात त्यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली आहे. शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी ठाकरे गटावर टीका करताना त्यांनी आनंद दिघे यांच्या मृत्यूची आठवण काढली आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, उद्धव ठाकरे भेटून गेल्यानंतर 30 मिनिटांनी आनंद दिघे यांचा मृत्यू झाला. त्यावरूनच आता राजकारण तापले आहे.
त्यांच्या या वक्तव्यावरून केदार दिघे यांनी शिंदे गटालाच आता प्रतिसवाल उपस्थित करत आनंद दिघे यांच्या पश्चात आता अशा प्रकारचा संशय हा व्यक्त करण्यात येत आहे.
परंतु हे 22 वर्षानंतर असा संशय व्यक्त केला जात आहे हे दुर्देवी असल्याची मत त्यांनी व्यक्त केले आहे. या 22 वर्षात हे सर्व मंडळी याच शिवसेना पक्षात होते ज्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते.
त्याच शिवसेनेवर अनेक पदं या नेत्यांनी उपभोगली आहेत.या पदाचा लाभ उठवताना या लोकांनी उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली नगरसेवक, आमदार मंत्री, खासदार हे सगळे उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहेत तरीही त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केले जाते आहे हे चुकीचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
उद्धव ठाकरे यांना अनेक वेळा ठाण्यामध्ये कार्यक्रमाला बोलावले गेले, त्यांचा फायदा करून घेतला गेला. तरीही आज या ठिकाणी घाणेरड्या राजकारणासाठी आनंद दिघे यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे.
त्यामुळे लोकांची दिशाभूल करण्याचं कामही त्यांनी सुरू केले आहे. त्याचबरोबर मूळ विचार त्यांचा बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा घणाघातही त्यांनी केला आहे.
मीनाक्षा शिंदे यांना आनंद दिघे यांच्या अशा काही गोष्टी जर माहित होत्या तर मग 22 वर्षे जी पदं भूषवली त्यावेळी त्याची तुम्हाला आठवण का झाली नाही असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
मध्यंतरी नारायण राणे यांच्या घरातूनही निलेश राणे यांनीदेखील अशाच प्रकारचे वक्तव्य केलेले होते. जेव्हा जेव्हा निवडणूक होते किंवा जेव्हा मुख्य विषय बाजूला करायचा असेल त्या त्यावेळी अशा प्रकारची विधानं केली जातात असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.
आजही शिंदे गटातील नेते आनंद दिघे यांच्याविषयी बोलताना म्हणतात की, दिघे साहेब हे आमचे दैवत होते, ते जर तुमच्यासाठी दैवत होते तर तुम्ही 22 वर्षे का शांत बसला होता असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. त्यामुळे हे असे 22 वर्षांनंतर असे विषय काढून हे स्वार्थी राजकारण करण्याचा प्रयत्न करतात असा टोला त्यांनी यावेळी सांगितल आहे.
आनंद दिघे गेल्यानंतर 22 वर्षानंतर असे विषयी काढून स्वार्थी राजकारण करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.ज्या वेळी आनंद दिघे गेले त्यावेळी अनेक नेते त्यांना भेटून गेले होते.
त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच नारायण राणे, राज ठाकरे हेदेखील नेते तिथे होते. त्याचबरोबर आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील तिथे उपस्थित होते. त्यामुळे आता मीनाक्षी शिंदे यांच्या संशयाची सुई ही प्रत्येकाकडे जाते असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.