मुंबई : नबाव मलिक यांना तब्बल दीड वर्षानंतर आरोग्याच्या कारणास्तव जामीन मंजूर झालाय. पण जेलबाहेर आलेल्या नवाब मलिक यांच्या समोर सध्या राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे. ज्या भाजपवर आरोप करत नवाब मलिक आधी तुटून पडायचे. त्याच भाजपबरोबर आता राष्ट्रवादीचा अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. त्यामुळं नवाब मलिक यांना राजकीय भूमिका घ्यायला अडचण येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीनं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली. फेब्रुवारी २०२२ मध्ये झालेल्या अटकेला त्यावेळी पार्श्वभूमी वेगळी होती. नवाब मलिक तेव्हा रोज भाजपविरोधात पत्रकार परिषद घेऊन वातावरण निर्मिती करत होते. त्याच्यावरुन देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर त्यांचं शाब्दिक युद्धही रंगलं. पण आता जामीन मिळाल्यानंतर परिस्थिती बदलली आहे. राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत भाजपबरोबर सहभागी झाला. त्यामुळं नवाब मलिक यांचा पाठिंबा अजित पवार गटाला मिळेल असं सांगितलं जातंय.
नवाब मलिक यांच्या जामिनानंतर दोन्ही राष्ट्रवादी कार्यालयात जल्लोष करण्यात आला. तसंच सुप्रिया सुळे यांच्यासह अजित पवार गटातले नेते मलिक यांना येऊन भेटले. पण जामिनाची अट ही वैद्यकीय असल्यानं राजकीय भूमिकेबाबत नवाब मलिक यांना सत्तेची बाजू घ्यावी लागण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे बघीतलं तर त्यातले बहुतांश नेते हे केंद्रीय तपास संस्थांच्या रडाववर होते. त्यात अजित पवार यांच्यासह, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ या नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळं तपास संस्थांचा ससेमिरा सोडवण्यासाठी अजित पवार यांचा गट हा भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाला. त्याचीच री नवाब मलिक यांनी ओढली नाही तर नवल वाटायला नको.
नबाव मलिक यांची प्रकृती ठीक नाही. त्यांचं वजन 25 ते 30 किलो आता घटलेलं आहे. त्यामुळे डॉक्टरांनी प्रकृतीची काळजी घेण्यास सांगितले. कुटुंबीयांना मलिक यांच्या प्रकृतीची चिंता आहे. नबाव मलिक यांचे बंधू कप्तान मलिक म्हणाले, वजन कमी झालं. किडनी स्पेशालिस्टसोबत चर्चा केली जाईल. माझे वडील गेल्यानंतर त्यांनी जबाबदारी सांभाळली. दोन महिन्यांसाठी घरी आले. ही आनंदाची बाब आहे. नबाव मलिक हे रुग्णालयात जाऊन तब्यत बरी करणार आहेत. त्यानंतर काय निर्णय घ्यायला ते घेतील. न्यायपालिकेवर विश्वास आहे.
अप्पा पाटील म्हणाले, नबाव मलिक यांची तब्यत बरी नाही. त्यांच्यावर उपचार करणे गरजेचे आहे. नबाव मलिक हे मुंबई महापालिकेत तसेच विधानसभेचा चेहरा आहेत. न्यायालयाने वैद्यकीय उपचारासाठी जामीन दिला आहे. नबाव मलिक यांची तब्यत लवकर बरी व्हावी. कार्यकर्त्यांना त्यांनी वेळ द्यावा. मुंबई शहरात बऱ्याच समस्या आहेत. नवाब मलिक यांच्या रुपाने सर्वसामान्यांना दिलासा मिळेल.