मुंबई | 19 जुलै 2023 : मुंबई आणि परिसरात पावसाने धुमशान माजविल्याने मुंबईची लाईफलाईन ( LifeLine Local Train ) लोकल सेवा कल्याण ते कसारा दरम्यान दुपारी ठप्प झाली होती. मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकातील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने कल्याणच्या पुढे राहणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान सायंकाळी 6.10 वाजण्यादरम्यान मध्य रेल्वेच्या मुख्य मार्ग, हार्बर मार्ग, ट्रान्सहार्बर आणि बेलापूर-खारकोपर या चारही कॉरीडॉरची वाहतूक सुरु झाल्याचे मध्य रेल्वेने ( Cenral Railway ) म्हटले. परंतू लोकलच्या लागोपाठ रांगा लागल्याने प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत आहे. यावेळी एसटी प्रशासनाला जादा बसेस सोडण्याचे आदेश जारी करण्यात आले.
बदलापूर येथे रुळांवर पाणी आल्याने सकाळी 11.05 वाजता अप आणि डाऊन मार्ग बंद करण्यात आला. त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली. यावेळी बदलापूर ते कर्जत आणि सीएसएमटी ते अंबरनाथ वाहतूक सुरु होती. कल्याण स्थानकात दुपारी 4.40 दरम्यान अतिवृष्टीने कसारा ते कल्याण लोकल बंद झाल्या. यावेळी पावसामुळे मुंबई ते पुणे शहरातील अनेक मेल-एक्सप्रेस रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले.
मुंबई आणि विशेषत: ठाणे तसेच रायगड जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने मध्य रेल्वेच्या सेवेवर परिणाम झाला. आधी सकाळी कल्याण येथून बिघाडाला सुरु झाली. नंतर पनवेल येथे सकाळी 9.40 वाजता सिग्नल यंत्रणा ठप्प झाल्याने पनवेल आणि बेलापूर दरम्यान लोकल वाहतूक विस्कळीत झाली. या दरम्यान बेलापूर ते सीएसएमटी वाहतूक सुरु होती. हा बिघाड स. 10.05 वाजता सुरळीत झाला. सायंकाळी 06.10 वाजता मध्य रेल्वेच्या मुख्य मार्ग, हार्बर मार्ग, ट्रान्सहार्बर आणि बेलापूर-नेरुळ-खारकोपर या चारही मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु असल्याचे जाहीर केले गेले. परंतू पावसामुळे लोकल गाड्यांची धिम्या गतीने होत असल्याने लोकलला प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.