मुंबई – गुवाहाटीवरून शिंदे गट मुंबईत दाखल झाला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आसाममध्ये कामाख्या देवी परिसरातमध्ये महाराष्ट्र सदनासाठी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनी जागा देऊ केली आहे. आम्ही कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. महाराष्ट्रातले लाखो भक्त कामाख्या देवीला जातात. त्यांची राहण्याची सोय होईल. त्यांना सुविधा मिळाव्यात, यासाठी आसाममध्ये महाराष्ट्र भवन निर्माण होईल. तिथं जागा देण्यासाठी आसामच्या मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. कामाख्या देवीला या राज्यावरील अरिष्ट दूर कर. या राज्यातला बळीराजा याच्या जीवनात चांगले दिवस येऊ दे. या राज्यातल्या जनतेला सुखी कर. समृद्ध कर. आनंदी कर. यासाठी देवीकडं प्रार्थना केली.
या राज्यात उद्योगांची भरभराट होऊ दे. मोठ-मोठे उद्योग येऊ दे. तरुणांच्या हातात काम येऊ दे. तरुण स्वतःच्या पायावर उभा राहू दे. हे राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, अशाप्रकारची प्रार्थना आम्ही कामाख्या देवीला केली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
कामाख्या देवीला जाणं हा काही राजकीय विषय नव्हता. हा श्रद्धेचा विषय होता. भक्तिभावाचा विषय होता. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनी आम्हाला निमंत्रण दिलं होतं. आसामच्या मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला निमंत्रण दिलं होतं. आम्हा सर्व आमदारांची इच्छा होती. कामाख्य देवीचं दर्शन घ्यावं. मनोभावे दर्शन झालं. सर्व समाधानी आहेत, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
गुवाहाटी दौऱ्यावर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. या टीकेवर काहीही न बोलता. आम्ही कशासाठी गेलो होतो. कामाख्य देवीला काय मागितलं, हे एकनाथ शिंदे यांनी मुंबईत परतल्यानंतर सांगितलं.