सध्या लोकसभा निकालाची चर्चा, त्याचे विश्लेषण, पराभवाची कारणे, त्यावरचे मंथन सगळ्याच पक्षात सुरु आहे. राज्यात भाजपनंतर सर्वाधिक फटका राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवार गटाला बसला आहे. त्यावर अजितदादांनी रोखठोक प्रतिक्रिया पण दिली आहे. त्यातच नेते प्रफुल्ल पटेल यांना ईडीने एक मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे पटेलांचा चेहरा प्रफुल्लित झाला आहे. त्यांना शंभर हत्तींचे बळ मिळाले आहे.
काय मिळाला दिलासा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना ईडीने मोठा दिलासा दिला आहे. PMLA कायद्यांतर्गत त्यांच्या वरळी येथील त्यांच्या मालकीच्या १२ व्या आणि १५ व्या माळ्यावरील फ्लॅटची जप्ती ईडीने रद्द केली आहे. जप्त करण्यात आलेल्या सीजे हाऊस फ्लॅटची किंमत १८० कोटी रुपये होती.
काय होता आरोप
ED ने 2022 मध्ये पटेल यांच्यासह त्यांची पत्नी वर्षा आणि त्यांची कंपनी मिलेनियम डेव्हलपर्स यांच्या मालकीचे किमान सात फ्लॅट्स जप्त केले होते, गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्या पत्नीकडून ही मालमत्ता पटेल यांनी बेकायदेशीररित्या खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता.सोमवारी याबाबत ईडीने ही मालमत्ता इक्बाल मिर्चीशी संबधित नसल्याचे म्हणणे मांडले आणि जप्ती रद्द केली.
ईडीने ज्या मालमत्तेवर कारवाई केली होती. त्यात दोन मजले हे इकबाल मिर्ची याच्या कुटुंबियांचे होते. त्यांना ईडीने अगोदरच जप्त केले होते. ही मालमत्ता व्यावसायिक कामांसाठी उपयोगात होती. प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप होता की, त्यांनी इकबाल मिर्चीशी करार करुन ही संपत्ती खरेदी केली आहे. ईडीच्या दाव्यानुसार हा करार 2007 मध्ये झाला होता. अर्थातच पटेल यांनी हा आरोप नाकारला होता. मनी लाँड्रिंगसंबंधीत या प्रकरणात ईडीने पीएमएलए कायद्यातंर्गत तपास करत होती. प्रकरणात ईडीने आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर 2019 मध्ये प्रफुल्ल पटेल यांची चौकशी करण्यात आली होती.
कोरोना काळानंतर राज्यात सत्तांतर झाले. शिवसेनेत उभी फुट पडली, शिंदे गट वेगळा झाला. भाजपशी घरोबा करत राज्यात युतीचे सरकार आले. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षात फुट पडली. अजित पवार गट युती सरकारमध्ये सहभागी झाला. महायुतीने एकत्रितपणे लोकसभा निवडणूक लढवली. निकालानंतर आता प्रफुल्ल पटेल यांना ईडीने मोठा दिलासा दिला. त्यांच्या मालमत्तेची जप्त रद्द केली.